Alpha Box Office Collection  Pudhari
मनोरंजन

Alpha Box Office: 'अल्फा'चा पहिल्याच दिवशी गेम ओव्हर? आलिया भट्टच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; किती कोटी कमावले?

Alpha Box Office Collection Day 1: आलिया भट्टचा बहुचर्चित 'अल्फा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे सुरुवात करू शकला नाही.

पुढारी वृत्तसेवा

Alpha Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यशराज फिल्म्सच्या (YRF) स्पाय युनिव्हर्समधील हा चित्रपट असल्याने या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रदर्शित होताच चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 'अल्फा'ची सुरुवात निराशाजनक झाली असून हा YRF स्पाय युनिव्हर्समधील सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 'अल्फा'ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे 9.25 कोटी रुपयांची नेट कमाई केली. देशांतर्गत चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन सुमारे 11.10 कोटी रुपये, तर परदेशात 5 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. अशाप्रकारे चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे जागतिक ग्रॉस कलेक्शन 16.10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

शिव रवैल दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. विशेषतः कथानक, पटकथा आणि काही प्रमुख कलाकारांच्या अभिनयावर सोशल मीडियावर टीका होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

विशेष म्हणजे, YRF स्पाय युनिव्हर्समधील याआधीच्या 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण', 'टायगर 3' आणि 'वॉर 2' या सर्व चित्रपटांनी पहिल्या दिवशी दमदार कमाई केली होती. त्यांच्याशी तुलना करता 'अल्फा'ची सुरुवात खूपच कमी झाली आहे.

आता या चित्रपटाची खरी कसोटी शनिवार आणि रविवारी लागणार आहे. विकेंडमध्ये कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच राहिला तर 'अल्फा'ला बॉक्स ऑफिसवर टिकून राहणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे येत्या दोन दिवसांतील चित्रपटाची कमाई निर्णायक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT