मनोरंजन

जय जय स्वामी समर्थ : अक्षय मुडावदकर स्वामींच्या भूमिकेबद्दल काय सांगतात?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे ७५० हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने अक्षय मुडावदकर (स्वामी समर्थांच्या भूमिकेत) यांनी आपला प्रवास सांगितला.

मालिकेच्या प्रवासाबद्दल आणि अनुभवा बद्दल अक्षय म्हणाले – ७५० हून अधिक भाग, अडीच वर्षांचा प्रवास, अगणित अनुभव, मोठ्यांचे आशीर्वाद, लहानांचं प्रेम…आणि स्वामी आजोबा म्हणून येणारी हाक….कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की आपल्या वाट्याला हे सगळं येईल. खरं तर ह्यापैकी फक्त १-२ गोष्टी जरी एक कलाकार म्हणून मिळाल्या असत्या तरी मी खुश असतो. मात्र आज स्वामी कृपेने इतकं मिळालंय. असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी मी घराबाहेर पडलो आणि कोणी येऊन भेटलं नाही. कधी लहान मुलं, कधी आजी आजोबा तर कधी कॉलेज ला जाणारी मुलं. हॉस्पिटल असो, रेल्वे स्टेशन, किंवा एअरपोर्ट… प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे प्रेक्षक भेटतील मनापासून प्रेम दाखवतात. खरं तर हे सगळं माझ्या साठी नसून स्वामींकरता आहे हे ही मे जाणतो.

ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो आणि एक माणूस म्हणून स्वतःला बदलण्याची एक संधी शोधू लागलो. माणूस म्हणून आपण कुठे चुकतोय हे परीक्षण करू लागलो. त्या गोष्टींवर मात करून सुधारण्याचा प्रयन्त करू लागलो. स्वामींबद्दल लहानपणापासून ऐकतोय. मात्र आता स्वामींना खूप जवळून पाहू लागलो, अनभवू लागलो. आपसूक ओढ लागते त्यांच्या भेटीची…खरंतर अक्कलकोटला गेल्यावर मला शांत बसून राहायला खूप आवडतं. असं वाटतं २-३ तास मला एकटं सोडा, कुणी बोलू नका माझ्याशी. तिथला परिसर, जिथे स्वामी फिरले असतील, जिथे जिथे त्यांचा वावर होता ते सगळं शांतपणे बसून अनुभवावंस वाटतं आणि तिथे बसून स्वामींना खूप प्रश्न विचारावेसे वाटतात. अक्कलकोटमधील माझं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे गुरुमंदिर येथे असलेलं राममंदिर. तिथल्या पायऱ्यांवर तासनतास शांत बसून समोर चारा खात निवांत बसलेल्या गायींकडे पाहत राहावंसं वाटतं.

जय जय स्वामी समर्थ

स्वामी म्हणतात की "हम गया नही जिंदा है" आणि खरंच हा अनुभव अक्कलकोटला गेल्यावर मिळतो…स्वामी अजूनही तिथेच आहेत हे जाणवतं.

पहिली मालिका आणि स्वामींची भूमिका साकारायला मिळाली, याविषयी अक्षय म्हणतात- काय आणि किती बोलू. सगळं सगळं दिलंय स्वामींनी. एक कलाकार म्हणून जे जे हवं असतं ते सगळं दिलंय. ओळख, प्रसिद्धी, मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याचे समाधान. आज माझ्या करिअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेने व्हावी. हा खरंतर मी माझ्या पुढील प्रवासाकरिता मिळालेला स्वामींचा आशीर्वाद समजतो. त्यांचं नाव घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करतो. एव्हढचं म्हणेन की, मी फक्त एक कलाकार आहे जो स्वामींच्या भूमिकेतून त्यांच्या लीला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा फक्त प्रयत्न करतोय. तेव्हा "स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असू द्या."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT