पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी' आणि अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुक केले होते. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची घोषणा केली होती. अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या आगामी चित्रपट 'जॉली एलएलबी 3' ची रिलीज डेट आता समोर आली आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट 2025 च्या सप्टेंबर महिन्यात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात सौरभ शुक्ला आणि हुमा कुरेशीदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहे.
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली. त्यांनी लिहिले, "अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' ची रिलीज डेट निश्चित झाली आहे. वायकॉम 18 स्टुडिओजने 19 सप्टेंबर 2025 रोजी या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी रिलीज डेट फिक्स केली आहे, जो फ्रेंचायझीमधला सर्वात मोठा चित्रपट ठरेल. मुख्य कलाकार- अक्षय कुमार (जॉली मिश्रा म्हणून) आणि अरशद वारसी (जॉली त्यागी म्हणून), दिग्दर्शक सुभाष कपूर आहेत."
पहिला 'जॉली एलएलबी' 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर 2017 मध्ये त्याचा सिक्वेल आला. तिसऱ्या भागात अक्षय आणि अर्शद यांच्यात थोड्या अधिक चुरशीचा मुकाबला होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये सौरभ शुक्ला जजच्या भूमिकेत पुन्हा दिसतील. 'जॉली एलएलबी 3' ची शूटिंग 2024 च्या मे महिन्यात अजमेरमध्ये सुरू झाले होते, जिथे शूटिंगसाठी विशेषतः अजमेरच्या डीआरएम कार्यालयात एक कोर्टरूम सेट तयार केला गेला होता.
अक्षय कुमारने अजमेरमध्ये शूटिंग पूर्ण केल्यानंतर अर्शद वारसीसोबत एक व्हिडिओ शेअर केला. या क्लिपमध्ये दोन्ही कलाकार रक्ताने माखलेली बाईक चालवताना दिसत आहेत, ज्यात चित्रपटाच्या एक्शन सीक्वेन्सचा इशारा दिला जातो. अभिनेता अक्षयने या व्हिडिओसोबत कॅप्शन दिलं होतं, "आणि हा शेड्यूल पूर्ण झाला, जसा तुम्ही पाहू शकता, दोन्ही जॉलींनी राजस्थानमध्ये चांगली मस्ती केली."