पुढारी ऑनलाईन
अर्थातच चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की 'भोला'हा शब्द अवतरणात असल्याने तो अजय देवगनचा आगामी चित्रपट असेल. होय हे खरेच आहे. नाही तर अजय काही इतका भोळा वगैरे नाही. उलट स्वभावाने तो खूच चेष्टेखोर आहे. चित्रपटाच्या सेटवर सहकलाकारांसोबत सर्वाधिक प्रँक करणारा अभिनेता म्हणूनच अजयची ओळख आहे. असो, तर अजयच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणास कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत सुरुवात झाली आहे. 2019 चा सुपरहिट तामिळ चित्रपट 'कैथी'चा हा रिमेक आहे.
'कैथी'चे दिग्दर्शन लोकेश कनगराज याने केले होते. अभिनेता कार्ती याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. कैथी म्हणजे कैदी. बर्याच काळानंतर तुरुंगातून सुटलेल्या एका कैद्याला त्याच्या मुलीला भेटायचे आहे; पण अचानक एक जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडते आणि त्याच्या लॉरीमधून जखमी पोलिसांना घेऊन त्याला प्रवास करावा लागतो, असे याचे कथानक आहे. आश्चर्य याच गोष्टीचे वाटते की, जे दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांंसाठी यू ट्यूबवर हिंदीमध्ये उपलब्ध आहेत त्या चित्रपटांचा हिंदी रिमेक करण्याचे प्रयोजनच काय?
'कैथी' हिंदीमध्ये यू ट्यूबवर आहे. मग सर्व कहाणी माहिती असताना केवळ अजय देवगणसाठी हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जायचे काय? हेच 'जर्सी' आणि 'विक्रमवेधा' बाबतही लागू पडते. नवीन संकल्पना, स्टाईल, कथानक याबाबत विचार न करता बॉलीवूडचे हीरो प्रेक्षकांना खूपच गृहीत धरतात, असे यावरून वाटते. दरम्यान, आगामी काळात अजयचे 'रन-वे 34', 'मैदान', 'रेड 2', 'थँक गॉड' हे चित्रपट येणार आहेत तर 'आरआरआर', 'गंगुबाई काठियावाडी'मध्ये त्याने कॅमियो केला आहे.