पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 : द रूल या चित्रपटाने भरघोस यश मिळविले. या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रमही केले आहेत. आता या चित्रपटाच्या बंपर यशानंतर अल्लू अर्जुन नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे.
अल्लू अर्जुनने अलीकडेच त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत नव्या चित्रपटाच्या निर्मितीबाबत चर्चा केली. या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगचे काम पूर्ण झाले असून त्रिविक्रम लवकरच अल्लू अर्जुनला अंतिम स्क्रिप्ट ऐकवणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुष्पा 2 नंतर आता अल्लू अर्जुन प्रेक्षकांसाठी नवीन मेजवानी घेऊन येणार असल्याचे दिसून येत आहे. त्रिविक्रम श्रीनिवास यांनी या नवीन प्रोजेक्टच्या प्री प्रॉडक्शनचे काम पूर्णत्वाकडे नेले असून स्टारकास्ट काय असेल हे लवकरच समोर येईल.
सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना यांचा 'पुष्पा 2 ' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड बनविले. अल्लू अर्जुनही या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाचा आनंद साजरा करत आहे.
आता अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटाबाबत रंजक माहिती समोर आली आहे. 'पुष्पा 2'च्या यशानंतर अल्लू अर्जुनने आता त्रिविक्रम श्रीनिवाससोबत काम करत असलेल्या त्याच्या पुढच्या चित्रपटावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रोजेक्ट खूप आधीच लॉक करण्यात आला होता. या चित्रपटाचे नाव अध्याप समोर आले नसून अजून गुलदस्त्यात आहे. हा येणारा चित्रपट त्रिविक्रमचा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असेल.
रिपोर्ट्सनुसार, टीमच्या जवळच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स्क्रिप्टिंगचे काम पूर्णत्वाकडे आहे. सितारा एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करणार असून, नागा वामसी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा जानेवारी 2025 मध्ये, शुभ संक्रांतीच्या सणाच्या अनुषंगाने होणे अपेक्षित आहे.
त्रिविक्रमच्या प्री-प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू असून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध नावे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पीरियड ड्रामा असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याची अजून खात्री झालेली नाही.
त्रिविक्रमचा चित्रपट गुंटूर करम प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पण आता अल्लू अर्जुनसोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या यशाची खात्री करण्यासाठी तो खूपच खबरदारी घेत असल्याची माहिती समोर येत आहे. आता चाहते त्रिविक्रम आणि अल्लू अर्जुन प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.