Sanjay Narvekar Movie Afratafri Trailer out now  Pudhari photo
मनोरंजन

Sanjay Narvekar Movie Afratafri Trailer|एक कोटींच्या पॉलिसीसाठी 3 भावांमध्ये रंगणार ‘अफरातफरी’; टिझर पाहून हसू आवरणार नाही

एक कोटींच्या पॉलिसीसाठी तीन भावांमध्ये रंगणार ‘अफरातफरी’; टिझर पाहून हसू आवरणार नाही

पुढारी वृत्तसेवा

पैशांसाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याची गंमतीदार झलक दाखवणाऱ्या ‘अफरातफरी’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. तीन भाऊ, वडिलांची एक कोटी रुपयांची पॉलिसी आणि त्या पैशांसाठी सुरू झालेला गोंधळ अशी भन्नाट कथा या टिझरमधून समोर येत आहे.

शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने हे तीन भाऊ चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्या वडिलांनी अशी खास पॉलिसी काढलेली असते, ज्यानुसार त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास तिन्ही मुलांना तब्बल एक कोटी रुपये मिळणार असतात. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या या मोठ्या रकमेभोवती तिन्ही भावांच्या विचारांची चक्रं फिरताना दिसतात.

टिझरमध्ये तात्यांचा अपघात होताना दाखवण्यात आला आहे. त्यानंतरच्या दृश्यात त्यांच्या फोटोला हार घातलेला दिसतो. त्यामुळे तात्यांचा खरंच अपघाती मृत्यू झाला आहे का? तीन भावांना पॉलिसीचे एक कोटी रुपये मिळणार का? आणि या पैशांसाठी तिघे नेमकी कोणती ‘अफरातफरी’ करणार? असे अनेक प्रश्न टिझर पाहिल्यानंतर निर्माण होतात.

पैशांचे आमिष, तीन भावांची धावपळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीमुळे ‘अफरातफरी’ प्रेक्षकांना खळखळून हसवणारी मनोरंजनाची मेजवानी ठरण्याची शक्यता आहे. तीन भावांमधील केमिस्ट्री आणि त्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग हे चित्रपटात पाहता येणार आहे.

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अ स्कायलाईन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केलीय. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अफरातफरी’मध्ये मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अफरातफरीची कथा पैशांच्या हव्यासातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीभोवती फिरणारी आहे. एका पॉलिसीमुळे तीन भावांच्या आयुष्यात कोणता गोंधळ निर्माण होतो, याची छोटीशी झलक टिझरमधून दाखवली आहे. शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने या तिघांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग हे या चित्रपटाचं खास आकर्षण आहे.

- मिलिंद कवडे, दिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT