वेणेगाव : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत हिच्या कारला महामार्गावर काशीळ येथे भीषण अपघात झाला. आगामी ‘कपबशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुण्याहून सांगलीकडे जात असताना हा अपघात घडला. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने पूजा सावंत आणि सहकारी कलाकार सुखरूप आहेत.
पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कपबशी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व कलावंत काही दिवसांपासून राज्यभरातील विविध शहरांत प्रवास करत आहेत. पुणे येथून सांगलीकडे जात असताना महामार्गावर काशीळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यातील एका कारमधून पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे प्रवास करत होते.