Shefali Jariwala Death
'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. शेफाली तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. दरम्यान, तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. डॉक्टरांनी याबाबतचा अहवाल राखून ठेवला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुरुवातीला शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली होती. पण तिच्या मृत्यू प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.
तिच्या अचानक निधनाने चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिचे पार्थिव तिच्या घरी आणण्यात आले. यावेळी शेफालीची आई सुनीता यांना अश्रू अनावर झाले. तिच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी तिच्या मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा एक भाग म्हणून, तिच्या निधनापूर्वी नेमके काय घडले? हे समजून घेण्यासाठी तिच्या घरातील स्वयंपाकी आणि घरकाम करणाऱ्या नोकराची चौकशी केली जात आहे.
कूपर रुग्णालयाने शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूबाबत जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेफाली जरीवाला (वय ४२) हिला बेलेव्ह्यू रुग्णालयातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉ. आरएन कूपर रुग्णालयात आणण्यात आले. बेलेव्ह्यू रुग्णालयामध्येच तिला मृत घोषित करण्यात आले होते. तिचा मृतदेह रात्री १२:३० वाजता कूपर रुग्णालयात आणण्यात आला. सरकारी डॉक्टरांनी त्यावर पोस्टमॉर्टेम केले.
सुरुवातीला 'कांटा लगा' या रीमिक्स म्युझिक व्हिडिओमधील बोल्ड अदाकारीने शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे तिला "कांटा लगा गर्ल" असे टोपणनाव पडले.