बदलत्या काळाची पावलं ओळखता यायला हवीत. सोशल मीडिया आणि रील्सच्या वाढत्या प्रभावामुळे मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत मोठा बदल झाला आहे. पूर्वी मराठी चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना सर्वाधिक प्रसिद्धी आणि मानधन मिळत असे; मात्र आता ही जागा रीलस्टार्सनी घेतल्याचं मत अभिनेता किरण माने यांनी व्यक्त केलं आहे.
किरण यांची एक फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी पोस्टमध्ये रिअल कलाकार आणि रिल स्टार यांच्याबद्दलचं आजचं वास्तव दाखवलं आहे. रिल सटारच्या वाढत्या प्रभावामुळे कलाकारांवर काय परिणाम होतोय, हे पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.
चार वर्षांपूर्वीपर्यंत मराठी चित्रपट-टीव्ही कलाकार म्हणजे सगळ्यात मोठे सेलिब्रिटी मानले जायचे. आज ती जागा रीलस्टार्सनी घेतली आहे, असं किरण माने यांनी म्हटलं आहे. हल्ली प्रेक्षकांना सिनेकलाकारांपेक्षा रीलस्टार्सचे डायलॉग ऐकण्यात आणि त्यांना पाहण्यात अधिक रस असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दहीहंडीसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांपेक्षा रीलस्टार्सना, तसेच टीव्ही आणि चित्रपटातील अभिनेत्रींपेक्षा लोकप्रिय डान्सर्सना अधिक मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यासाठी त्यांनी नांदेड सिटीतील दहीहंडी कार्यक्रमाचं उदाहरण दिलं. या कार्यक्रमात ‘बिग बॉस’ फेम जान्हवीपेक्षा रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीला पाहण्यासाठी लोकांमध्ये अधिक उत्सुकता असल्याचं त्यांनी म्हटलं. या बदलाबाबत समाजात वेगवेगळी मतं व्यक्त केली जातील. मराठी कलाकार आणि कलाकृतींचा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्याशी कनेक्ट राहिलेला नाही, किंवा जेन झी मराठी मालिका आणि सिनेमे पाहत नाही, अशी कारणंही दिली जातील. मात्र, या चर्चा करून परिस्थिती बदलणार नाही, असं माने यांनी स्पष्ट केलं. काळ बदलतोय. लोकांचे चॉईसेस बदलतायेत. विशेषतः मराठी टीव्ही-चित्रपटांचं ग्लॅमर झाकोळलं गेलं आहे. कारणं अनेक असतील; पण जे आहे, ते आहे, असं म्हणत किरण माने यांनी मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडकडे लक्ष वेधलं आहे.
रीलस्टार्सकडे प्रेक्षकांचा वाढतोय ओढा?
किरण माने यांच्या पोस्टचा रोख सध्याच्या सोशल मीडिया संस्कृतीकडे असल्याचं दिसत आहे. आज एखादा कलाकार वर्षानुवर्षे काम करून लोकप्रिय होतो, तर दुसरीकडे एखादा रीलस्टार काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे रातोरात घराघरात पोहोचतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे, सोशल मीडिया स्टार्सची लोकप्रियता आता केवळ मोबाईलच्या स्क्रीनपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक रीलस्टार्सना जाहिराती, टीव्ही कार्यक्रम, चित्रपट आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमांमध्येही संधी मिळताना दिसत आहेत.
याआधी बिग बॉस मराठीमध्येही सोशल मीडिया स्टार्सचा सहभाग आणि त्यांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला होता. रीलस्टार सूरज चव्हाण याचं उदाहरण यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. त्याच्या सोशल मीडिया लोकप्रियतेनंतर त्याला चित्रपटातही संधी मिळाली. किरण माने यांनीदेखील सूरज चव्हाणच्या प्रवासाचं कौतुक करत तो रीलस्टार असतानाच त्याचं टॅलेंट ओळखलं गेल्याचं म्हटलं होतं.
रील्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या नव्या चेहऱ्यांचा प्रभाव आता सार्वजनिक कार्यक्रमांपासून जाहिराती आणि मनोरंजन क्षेत्रापर्यंत दिसून येत आहे. त्यामुळे बदलत्या प्रेक्षकांच्या पसंतीनुसार मराठी मनोरंजन क्षेत्रालाही स्वतःमध्ये बदल करावा लागणार का, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.