'दिल मिल गए' मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता सेहबान अजीम जंतर-मंतर येथे झालेल्या CJP आंदोलनात सहभागी झाला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आपल्याशी धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. तसेच आंदोलनातील काही दृश्ये अत्यंत मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगत त्याने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला.
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP) आंदोलन सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. नीट (NEET) प्रश्नपत्रिका गळतीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेता सेहबान अजीम याचाही समावेश आहे. 'दिल मिल गए' या मालिकेतून प्रसिद्ध झालेला सेहबान अजीम विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित सीजेपी आंदोलनात सहभागी झाला आणि त्यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जमध्ये तो जखमी झाल्याचे त्याने म्हटले आहे.
'तुझसे है राब्ता', 'दिल मिल गए' आणि 'बेपनाह' मालिकांमध्ये अभिनेता सेहबान अजीमने अभिनय साकारला आहे. विद्यार्थ्यांच्या संसद मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी आपल्यावर लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप त्याने एका मुलाखतीत केला असून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
अलीकडे CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी निषेध व्यक्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सेहबान अजीम आपल्या दोन महिला मैत्रिणींसह जंतर-मंतर येथे पोहोचला होता. मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता आपल्यावर लाठ्या चालवल्याचा त्याचा दावा आहे.
एका मुलाखतीत सेहबानने सांगितले की, या घटनेत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात सुजला आहे. हात, पाय आणि पिंडऱ्यांवर वारंवार लाठ्या मारण्यात आल्याचे त्याने म्हटले. पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरून बेदम मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला.
सेहबानच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी उपस्थित महिला, लहान मुले आणि इतर आंदोलनकर्त्यांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. अनेक मुले जखमी झाली असून काहींच्या अंगातून रक्तही वाहत होते, असा दावा त्याने केला.
या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करताना त्याने, ते दृश्य अत्यंत मन हेलावून टाकणारे होते, अशी प्रतिक्रिया दिली. सेहबानने, आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शांततापूर्ण निदर्शनांवर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.