Rishi Saxena talked about Live-in relationships with isha  Pudhari photo
मनोरंजन

Rishi Saxena-Isha Keskar:‘मुंबईत अविवाहितांना घर मिळणं कठीण’; १० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपवर ऋषी सॅक्सेनाचं स्पष्ट वक्तव्य

Rishi Saxena-Isha Keskar :मुंबईत अविवाहितांसाठी घर मिळणे कठीण, आम्ही १० वर्ष लिव्ह इनमध्ये; काहे दिया परदेस फेम ऋषी स्पष्टच बोलला

पुढारी वृत्तसेवा

मराठी अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना यांच्या नात्याची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चा होताना दिसते. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ऋषी आणि ईशा यांची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. मात्र, कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं.

ईशा आणि ऋषी गेल्या तब्बल १० वर्षांपासून एकत्र राहत असून त्यांचं नातं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. आपल्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर सुरुवातीच्या काळात दोघांनाही सोशल मीडियावर काही लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, या ट्रोलिंगचा स्वतःवर फारसा परिणाम होत नसल्याचं ऋषीने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना ऋषीने सांगितलं की, ईशाला मात्र लोकांच्या कमेंट्सचा जास्त त्रास होतो. तिला अस्वस्थ वाटू लागतं. त्यांच्या नात्यावर भाष्य करताना काही जण ऋषीच्या मूळ गावाबाबतही चुकीची माहिती देतात. “तो यूपीचा आहे,” अशा प्रकारच्या कमेंट्स ईशाला ऐकायला मिळतात. त्याच्याबद्दल अनेकदा चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात ऋषी सक्सेना हा राजस्थानचा असून त्याचं शालेय शिक्षण जोधपूरमध्ये झालं आहे.

लिव्ह इनमध्ये राहण्याबद्दल ऋषी सक्सेना म्हणाला..

लिव्ह-इनमध्ये राहण्याबाबतही ऋषीने आपली भूमिका स्पष्ट केली. दोघंही अशा पद्धतीने एकत्र राहत असल्याची माहिती आता सर्वांनाच आहे आणि त्याबद्दल आपल्याला कधीही अस्वस्थ वाटलं नसल्याचं त्याने सांगितलं. उलट, लोकांच्या बोलण्यामुळे ईशाला कधीकधी त्रास होतो, असं त्याने नमूद केलं.

विशेष म्हणजे, ईशा आणि ऋषीच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांकडूनही मोठा विरोध झालेला नाही. मात्र, अविवाहित जोडप्यांना मुंबईत घर भाड्याने घेताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो, असेही तो म्हणाला.

ऋषीने वडिलांना सांगितलं होतं लिव्ह-इन बद्दल..

ऋषी म्हणाला, जेव्हा मी माझ्या बाबांना लिव्ह-इनबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते, ''आता बेटा तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा.''

तो घर मिळण्याबद्दल म्हणाला की, ''तुम्ही जर अविवाहित असाल तर तुम्हाला भाड्याने घर घेण्यात अडचणी येतात. मुंबईत अशा बऱ्याच सोसायटी आहेत, ज्यामध्ये लग्न झालेलं असेल तरच राहायला घर मिळेल असा नियम आहे. म्हणजे, जरी तुम्ही १० वर्षे एकत्र असाल आणि तुमचं लग्न झालेलं नसेल तरीही तुम्हाला घर मिळणार नाहीये.''

दरम्यान, लग्नाचा विषय निघाल्यानंतर ऋषी म्हणाला की, ''योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही लग्न करू. आम्हाला एकत्र राहायचंय हे तर नक्की झालेलं आहे, आता आम्हाला एकत्र राहून १० वर्षे होतील.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT