सुधीर मोकाशे
‘ही मॅन’ धर्मेंद्र यांच्या अभिनयाची जशी सर्वदूर चर्चा झाली, तशाच प्रकारे त्यांच्या विशाल कुटुंबाविषयीही सर्वांनाच अप्रूप राहिले. 1954 साली, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पंजाबमधील प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला. त्या काळात धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत आले नव्हते. या दाम्पत्याला सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल ही चार अपत्ये आहेत.
सनी देओल (अजयसिंह देओल)
सनी देओल हे धर्मेंद्र यांचे मोठे पुत्र. गदर, घायल, बॉर्डर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्यांना ॲक्शन स्टार म्हणून ख्याती दिली. त्यांचा विवाह लिंडा देओल (पूजा देओल) यांच्याशी झाला असून त्या अँग्लो इंडियन वंशाच्या आहेत. सनी आणि पूजा यांना करण आणि राजवीर हे दोन पुत्र आहेत. यापैकी करण देओल याने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. 18 जून 2023 रोजी त्याने आपल्या दीर्घकाळची मैत्रीण द्रिशा आचार्य हिच्याशी विवाह केला. राजवीर देओल याने डोनो या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून तो अद्याप अविवाहित आहे.
बॉबी देओल (विजयसिंह देओल)
धर्मेंद्र यांचे धाकटे सुपुत्र बॉबी देओल यांनी गुप्त, सोल्जर, रेस 3 आणि ॲनिमल यांसारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1996 साली त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तान्या आहुजा देओल यांच्याशी विवाह केला. तान्या ह्या सुप्रसिद्ध डिझायनर व व्यावसायिक आहेत. या दाम्पत्याला आर्यमन आणि धरम हे दोन पुत्र आहेत. हे दोघेही सध्या शिक्षण घेत असून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.
विजेता देओल (लिली गिल)
विजेता देओल यांनी विवेक गिल यांच्याशी विवाह केला आहे. त्या आपल्या पतीच्या कंपनीत संचालिका आहेत. या दाम्पत्याला मुलगा साहिल आणि मुलगी प्रेरणा अशी दोन मुले आहेत. हे कुटुंब दिल्लीमध्ये वास्तव्यास आहे.
अजीता देओल
धर्मेंद्र यांची धाकटी कन्या अजीता देओल यांनी वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात करिअर निवडले आहे. त्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पती किरण चौधरी (दंतचिकित्सक) आणि दोन मुली निकिता व प्रियंका चौधरी यांच्यासह वास्तव्यास आहेत. अजीता सध्या तेथील शाळेत अध्यापनाचे कार्य करतात.
धर्मेंद्र - हेमा मालिनी
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांची ओळख अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झाली. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘जुगनू’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांच्या जोडीच्या चर्चांना वेग आला आणि अखेर 1980 साली त्यांनी विवाह केला. त्यावेळी धर्मेंद्र आधीपासून विवाहित असल्यामुळे या विवाहावर बरीच चर्चा आणि वाद झाले. असे म्हटले गेले की, दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून विवाह केला. परंतु 2004 साली धर्मेंद्र यांनी या सर्व अफवांचे खंडन केले.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन कन्या आहेत. ईशा आणि अहाना. ईशा देओल यांनी धूम, ना तुम जानो ना हम, क्या दिल ने कहा यांसारख्या चित्रपटांत अभिनय केला. 2012 साली त्यांनी व्यावसायिक भरत तख्तानी यांच्याशी विवाह केला आणि त्यांना दोन मुली झाल्या. परंतु काही वर्षांनंतर ईशा आणि भरत यांच्यात मतभेद निर्माण झाले व अखेर त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या त्या दोन्ही कन्यांचा सांभाळ दोघे मिळून करतात. दुसरीकडे अहाना देओल यांनी वैभव वोहरा यांच्याशी विवाह केला असून त्यांना तीन अपत्ये आहेत. एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली. अहाना काही काळ अभिनयात होती. परंतु सध्या त्या कुटुंबासह शांत जीवन जगणे पसंत करतात.
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर या स्वतंत्रपणे राहतात; तर हेमा मालिनी मुंबईत आपल्या मुलींसह वास्तव्यास आहेत. धर्मेंद्र स्वतः बराच काळ लोणावळ्याच्या त्यांच्या फार्महाऊसमध्ये वेळ घालवत असत. त्यांच्या दोन्ही विवाहांमधून निर्माण झालेला हा विस्तृत परिवार आज 13 नातवंडांपर्यंत पोहोचला आहे. देओल घराण्यातील प्रत्येक पिढीने आपल्या मार्गाने नाव कमावले आहे. कुणी अभिनयातून, कुणी व्यवसायातून, तर कुणी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून आपली प्रतिष्ठा उंचावली आहे. धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वात जसा ॲक्शन, इमोशन आणि परंपरा यांचा सुंदर संगम होता, तसाच तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबातही जाणवतो. आज त्यांच्या जाण्याने सबंध देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.