‌Aatli Batmi Phutli | ‘आतली बातमी‌ फुटली’ मध्ये कथेचा आत्माच नाही! Pudhari File Photo
मनोरंजन

‌Aatli Batmi Phutli | ‘आतली बातमी‌ फुटली’ मध्ये कथेचा आत्माच नाही!

वयस्कर जोडप्यांची व्यथा सांगण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

अनुपमा गुंडे

याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी आणि अभंगाचा सार असं जगणं आणि मरणही वाट्याला यावं अशी प्रत्येक मानवी मनाची इच्छा असते. पण प्रत्येकाच्या वाट्याला अशा शेवटचा दिस गोड होण्याची शाश्वती नसते, जगण्याच्या लढाईतील संघर्षाला आत्मबळ देऊन मन सामोरे जात असले तरी मृत्यूचे भय प्रत्येकाच्या मनात दाटलेलं असतं..विशेषतः संध्या-छाया भिववतीच्या काळात आपण मरणाच्या दारात खितपत तर पडणार नाही, ही भीती असते, आणि एखाद्या आजारानं गाठलं, तर मृत्यूची याचना करत मरणयातना भोगण्याइतक्याच वेदना मागे राहणार्‍या सहचार्‍याच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून मरण ओढवून घेणार्‍या वयस्कर जोडप्यांची व्यथा सांगण्याचा प्रयत्न आतली बातमी फुटली ... या चित्रपटाने केला आहे.

खरं तर हा चित्रपट इच्छा- मरणासारख्या ज्वलंत विषयाला हात घालणारा आहे, परंतु दिग्दर्शकाला चित्रपटाला व्यावसायिक करण्याच्या नादात चित्रपटाचा आत्मा हरवला आहे. चित्रपटाची कथा मोहन आगाशे (डॉ. भास्कर वानखेडे), रोहिणी हट्टगंडी (सविता) आणि सिध्दार्थ जाधव (सचिन गावडे) यांच्या भोवती फिरणारी आहे. सचिन गावडे हा रिक्षाचालक. त्याच्या रिक्षात कुणीतरी सोडून गेलेल्या मुलीला तो जीवापाड जपत असतो. त्यातच या मुलीला हृदयाचा विकार असल्याने तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे उभारण्याची त्याची धडपड अयशस्वी ठरते आणि नाइलाजाने तो बँकेत चोरी करतो. त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागतो आणि तो वानखेडेच्या चाळीत त्यांच्या घरात घुसतो. तिथून चित्रपट एका वळणावर येतो.

आपण आजवर सन्मानाने जगलो आता मरणही सन्मानाच यावं म्हणून डॉ. वानखेडे चक्क आपल्या पत्नीच्या खुनाची सुपारी देतात आणि पत्नीच्या मागे आपले हाल होऊ नयेत म्हणून स्वतःचा आत्मघात करण्याची त्यांची तयारी असते. या आत्मघातात दोघांपैकी कुणी कच खायचा नाही याची जय्यत तयारी दोघांची असते, तर जीवनाशी संघर्ष करत असताना मुलीचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणारा सचिन गावडे या दोघांपुढे जीवनाची सुंदरता विषद करतो. त्यातून हे दोघे काय बोध घेतात, असे कथासूत्र आहे.

आतली बातमी फुटली या नावावरून चित्रपट पत्रकारितेच्या माध्यमावर आधारित असेल असे वाटते, पण नावाचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे कळते, पण का, कुठे, कधी, केव्हा, कसे आणि का ही बातमीची मूल्ये चित्रपटाच्या आतल्या बातमीत नसल्याने एक सरळधोपट चित्रपट झाला आहे. रोहिणी हट्टगंडी, मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारखे मुरलेले कलाकार ही चित्रपटाची जमेची बाजू. या तिघांनी काय, अन्य पात्रांनी चित्रपटाच्या कथानकात अभिनयाची बाजू पेलून धरली असली तरी कथासूत्राचा आत्मा हरवला असल्याने चित्रपट भरकटला आहे. संध्याछायेच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील भय जागवणार्‍या संवेदनशील विषयाला व्यावसायिक वळण दिल्याने चित्रपटाचा आत्माच हरवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT