आमीर खान आणि त्याचे कुटुंब अलीकडेच चर्चेत आले आहे ते भाऊ फैसल खान यांच्या संवादामुळे. फैसलने एका मुलाखतीमध्ये आमीरसह कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. या आरोपाने व्यथित झालेल्या आमीरच्या कुटुंबाने नुकतेच एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये त्यांनी फैसलबाबत भूमिका जाहीर केली आहे. (Latest Entertainment News)
एका प्रथितयश पोर्टलने अलीकडेच फैसलची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये तो म्हणतो, ‘मला स्क्रिझोफेनिया झाला आहे आणि मी वेडा आहे असे मला सांगितले गेले. मला वाटले की मी अडकलो आहे. मी समाजाला नुकसान पोहचवू शकतो. मी स्वतला पाहू शकतो की मी यातून कसा बाहेर पडू शकलो. माझ्या विरोधात हा कट केला जात होता. माझे कुटुंब माझ्या विरोधात होत. आमीरने मला जवळपास एक वर्ष कोंडून ठेवले होते.
माझ्याजवळ फोन नव्हते. माझ्या रूमच्या बाहेर बॉडीगार्ड असायचे. मला कुठेच बाहेर जायला परवानगी नव्हती. जवळपास एक वर्षांनंतर आमीरने मला दुसऱ्या घरात राहायला जायची परवानगी दिली.’
फैसलने केलेल्या या खुलाशावर आमीर खान आणि त्याचे कुटुंबीय चांगलेच नाराज झाले आहेत. यानंतर आमीर आणि कुटुंबियांनी एक पत्रक जाहीर करून त्यांची भूमिका समोर आणली आहे.
या पत्रकात खान कुटुंबीय म्हणतात, ‘आम्ही फैसलकडून आई झीनत ताहिर हुसैन, बहीण निखत हेगडे आणि भाऊ आमीर यांच्याविरोधात जी चुकीची आणि त्रासदायक प्रतिमा उभी केली आहे. त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. त्यामुळे आमच्या भावना समोर आणणे आणि कुटुंब म्हणून आमची एकजूट दर्शवणे गरजेचे वाटते आहे.
हे सांगणे गरजेचे आहे की फैसलच्या बाबतीत कुटुंबाने घेतलेला प्रत्येक निर्णय अनेक डॉक्टरांशी चर्चा करूनच घेतला आहे.
हे सर्व निर्णय प्रेम, काळजी आणि त्याच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याला स्थिरता लाभण्यासाठी घेतले होते. त्यामुळेच आमच्या कुटुंबासाठी हा काळ कठीण आणि नकोशा आठवणींचा आहे त्यामुळेच या गोष्टी आम्ही सार्वजनिकपणे बोलणे टाळले आहे.
आम्ही माध्यमांना विनंती करतो की एका खासगी गोष्टीला चटपटीत आणि भडक गप्पांमध्ये बदलू नये.
रीना दत्ता, जुनैद खान, इरा खान, फरहत दत्ता, राजीव दत्ता, किरण राव, संतोष हेगडे, सेहर हेगडे, मनसूर खान, नुझत खान, इमरान खान, टीना फॉन्सेका, झेन मेरी खान, पाब्लो खान.’
आमीर खान आणि फैसल खान यांनी मेला या सिनेमात एकत्र काम केले आहे. 2000 मध्ये आलेल्या या सिनेमात त्यांच्यासोबत ट्विंकल खन्नाही दिसली होती.