पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही अभिनेता आमिर अलीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्याच्यासोबत रेल्वेमध्ये घडलेल्या लैंगिक शोषणाबद्दल त्याने धक्कादायक माहिती दिलीय. १४ वर्षांचा असताना त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला होता. या घटनेनंतर त्याला मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यानंतर त्याने मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करणे बंद केल्याचेही सांगितले. (Actor Aamir Ali)
आमिर म्हणाला की, या घटनेमुळे त्याच्या मनात त्या पुरुषांबद्दल नकारात्मक विचार येत होते, जे अन्य पुरुषांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात. पण, जसजसा तो मोठा होत गेला, तसतसे त्याला समजले की आपण सर्व समलिंगी पुरुषांकडे एकाच दृष्टीकोणातून पाहू नये. त्याला किशोरवयात वाईट अनुभव आला होता, त्यावरून आमिरचे विचार नकारात्मक झाल्याचे त्याने सांगितले. (Actor Aamir Ali)
आमिरला त्याच्या समलैंगिक मित्रांच्या विषयी विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, "तो माझा पहिला रेल्वेतून प्रवास होता आणि त्यानंतर मी कधीही रेल्वेतून प्रवास केला नाही. कारण मला खूप चुकीच्या पद्धतीने मागून स्पर्श करण्यात आला होता. तेव्हा माझे वय १४ वर्ष होते. त्या घटनेनंतर मी माझी बॅग मागून घट्ट पकडणे सुरु केले. मग कुणीतरी माझ्या बॅगेतून पुस्तके चोरली. मला आश्चर्य वाटलं की, पुस्तके कोण चोरतं आणि त्यानंतर मी कधीही रेल्वेने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला."
आमिर अलीने पुढे सांगितलं की, जेव्हा काही मित्रांनी आमिरला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की, आपल्या मागील अनुभवांमुळे आपण सर्वांना एकाच नजरेने पाहू नये. माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं होतं की, 'ते' पुरुषांकडे आकर्षित होतात. ज्यावेळी मित्रांनी सांगितलं तेव्हा मला मला वाटलं की, मला आलेल्या काही अनुभवांमुळे मी चुकीचा दृष्टीकोण ठेवला होता. पण जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा हळूहळू विचार बदलतात."