पुढारी ऑनलाईन डेस्क - कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' ही मालिका आपल्या अनोख्या कथानकामुळे आणि दैवी चमत्कारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. श्रद्धा, विश्वास, आणि निस्सीम भक्तीचे महत्त्व दर्शवणारी ही मालिका आता आश्रमातल्या दीपोत्सवात एक अद्वितीय दृश्य सादर करणार आहे.
मागील भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, मनोरमा तुळजाला आव्हान देते की, दीपोत्सवात तेलाऐवजी पाण्याचे दिवे लावून दाखवावे. यादरम्यान दीतीच्या सांगण्यावरून मनोरमाने संमोहित केलेल्या लहानग्या उमा आणि देवी तुळजाचा भावनिक संबंध पुन्हा दृढ होतो आणि देवीच्या चमत्काराने दीपोत्सव साजरा होतो. देवीने स्वीकारलेले आव्हान आणि ते पूर्ण करण्यासाठी झालेला चमत्कार तसेच त्यादरम्यान महिषासुराचा आश्रमात नाट्यमय प्रवेश हा उत्कंठावर्धक घटनाक्रम याभागात उलगडणार आहे,
तुळजाभवानीच्या या प्रेरणादायी चमत्काराने प्रेक्षकांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित होणार हे नक्कीचं! दिव्यांचा हा अद्भुत दीपोत्सव,देवीची भक्ती आणि श्रद्धेचा साक्षात्कार दाखवणारा ठरणार आहे. रसिकवर्ग आतुरतेने या भागाची वाट पाहात आहेत. 'आई तुळजाभवानी', संध्याकाळी ९ वा. कलर्स मराठीवर पाहता येईल.