Latest

सामूहिक अत्याचाराच्या घटनेने सातारा जिल्हा हादरला; पीडितेच्या पती, मुलांचाही छळ

दिनेश चोरगे

फलटण; पुढारी वृत्तसेवा :  सोनवडी येथील अत्याचारप्रकरणी चारकोल मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा मालक हसन लतिफ शेख याला फलटण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेने फलटणसह जिल्हा हादरला आहे.

पीडित महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दिवाळीमध्ये आम्ही आंध्र प्रदेशमधील काम संपवून घरी जात होतो. पंढरपूर येथे ट्रेन बदलण्यासाठी म्हणून उतरलो. तेथे संशयित शेठ आम्हाला भेटला. आमच्याकडे कामाला चला, असे तो म्हणत होता. मात्र, आम्ही त्याला नकार दिला. त्यावर मी प्रत्येकाला दहा-दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देतो, असे त्याने सांगितले. त्यावर दहा हजार नको, पाच हजार रुपये द्या. आम्हाला जर काम पटलं तर आम्ही राहू नाहीतर आम्ही परत येऊ असे सांगितले. त्यानंतर त्याने आम्हाला सोनवडी येथे नेले.

इथे आल्यावर आमची आधार कार्ड, मोबाईल काढून स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली. आमच्या मुलांनासुद्धा स्वत:च्या घरामध्ये ताब्यात ठेवले. मुलांना आमच्याकडे द्या, अशी मागणी आम्ही केली. जर तुम्हाला मुलं हवी असतील तर मी बायकोला घेऊन जातो, असे त्याने माझ्या पतीला धमकावले. त्यादिवशी पती लहान मुलांना डबा घेऊन गेला. त्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास मालकाने त्याच्या घरामध्ये पती व मुलांना बंद केले. लगतच्या झोपड्यातील लोकांना 'बाहेर आला तर मारुन टाकेन', असा दम भरला. तू तयार झाली नाही तर तुझ्या नवर्‍याला व मुलांना मारुन टाकेन, असेही धमकावले. मालकासोबत आणखीन पाच-सहाजण होते. पहिल्यांदा मालकाने अत्याचार केला. नंतर अन्य पाच ते सहा जणांनी पण अत्याचार केला.

दरम्यान, संशयित कोळसा व्यापार्‍यावर यापुर्वीही बालगुन्हेगारीचा, अवैध कोळसा जमा केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे समजते. या घटनेने तालुका हादरला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली.

अजूनही 25 कातकरी कुटुंबे कामाला

आम्ही होतो त्या ठिकाणी आणखी सुमारे 25 कातकरी कुटुंबे त्याच्याकडे कामाला अजूनही आहेत. तिथे संध्याकाळी झाली की सगळ्या कुटुंबांची जी लहान लहान मुले आहेत त्यांना संशयित आपल्या ताब्यात घेत असल्याचेही पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT