अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन कुटुंबियांना सतत शिवीगाळ आणि मारहाण करत त्रास देणाऱ्या बापाचा मुलाने खून केल्याची घटना तालुक्यातील उडदावणे येथे घडली. मुलगा सुरेश गिऱ्हे याने आपला चुलता एकनाथ गिऱ्हे याच्या साथीने हा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुनिल सोमा गिऱ्हे (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अकोले पोलिसांनी सुरेश गिऱ्हे आणि एकनाथ गिऱ्हे या दोघांना अटक केली.
गंगुबाई सुनील गिऱ्हे (वय ३७ रा. उडदावणे) यांनी राजूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मी, माझे पती सुनिल सोमा गिऱ्हे आणि मुलगा सुरेश गिऱ्हे एकत्र राहतो. तर शेजारी चुलत दिर एकनाथ सोमा गिऱ्हे हा त्याच्या कुटूंबासोबत राहायला आहे. काही दिवसापासुन सुनिल गिऱ्हे हे दारु पिऊन नेहमी मला व मुलाला शिवीगाळ करुन मारहाण करीत असत. ते शुक्रवार १६ रोजी शेंडीमध्ये आठवडा बाजारासाठी गेले आणि सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चिकन घेऊन आले. तू चिकनची भाजी तयार कर. तोपर्यंत मी जेवणासाठी पाहुण्याला घेऊन येतो, असे म्हणत ते घराच्या बाहेर निघुन गेले.
रात्री ९ वाजेच्या सुमारास सुनिल हे दारु पिऊन घरी आले. मला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आमचा आरडाओरडा ऐकून माझे दिर एकनाथ सोमा गिऱ्हे व मुलगा सुरेश गिऱ्हे हे तेथे आले. त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण करू नका, असे समजावुन सांगत असताना मयत सुनिल गिऱ्हे यांनी त्यांना देखील शिवीगाळ केली. तेव्हा माझ्या मुलाला राग आल्याने त्यानं घरात पडलेला कोयता उचलुन वडिलांच्या पाठीवर तीन ते चार वेळा मारला. त्यामुळे ते जमिनीवर पडले. त्यानंतर मुलगा आणि दिराने दोरीने पतीचा घरामध्ये गळा आवळला. त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. नंतर दिर आणि मुलाने त्यांना घरातच झोपवून त्यांच्यावर चादर टाकली. 'आम्ही याला जिवे ठार मारले आहे. या बाबत कोणाला काही सांगितले, तर तुला देखील याच्या सारखेच जिवे ठार मारु, असे गंगुबाई सुनील गिऱ्हे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून दिर एकनाथ गिऱ्हे व मुलगा सुनिल गिऱ्हे या दोघांच्या विरोधात राजुर पोलिसांत भा.द.वि.कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजूर पोलिसांनी आरोपींना अटक केली असुन पुढील तपास स.पो.नि.गणेश इंगळे करीत आहे. तसेच मयत सुनिल सोमा गिऱ्हे यांच्या मृतदेहाचे शवविछेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.