पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ च्या साखळी सामन्यात स्मृतीने ही कामगिरी केली. याआधी भारताच्या कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही अशी कामगिरी केली आहे.
स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात एक मोठा पराक्रम केला आहे. स्मृतीने १७ वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. बांगलादेश विरुद्ध स्मृती ३० धावांवर बाद झाली. तिने ५१ चेंडूंचा सामना करत ३ चौकारांच्या साहाय्याने ३० धावा केल्या. ती या डावात देखील चांगली फलंदाजी करत होती. परंतु बांगलादेश विरुद्ध तिला मोठी खेळी करता आली नाही. स्मृती मंधानासाठी ही स्पर्धा चांगली राहिली आहे. कारण आतापर्यंत तिने २५० हून अधिक धावा केल्या आहेत.
मंधानाने एकदिवसीय सामन्यात एकूण ६ आणि कसोटीत एक शतक शतकी खेळी साकारली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८६ धावा आहे. मंधानाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील ६ सामन्यांमध्ये २५० हून अधिक धावा केल्या आहेत. तिची सर्वोत्तम धावसंख्या १२३ धावा आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
डावखुरी फलंदाज स्मृतीने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७१७ धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३२५ धावा केल्या आहेत, तर महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या बॅटमधून १९७१ धावा झाल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने ११९ चेंडूत १२३ धावांची शानदार कामगिरी केली आहे. तिने आपल्या खेळीत २ षटकार आणि १३ चौकार मारले. या डावात मंधानाचा स्ट्राईक रेट १०३.३६ होता.