Latest

धक्कादायक: राजगुरूनगरमध्ये ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

अमृता चौगुले

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवर आईच्या कुशीत बसुन निघालेल्या सहा महिन्यांच्या कोवळ्या मुलीचा मृत्यु झाला. बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीची कोंडी यामुळे तोल जाऊन दुचाकी पडली आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुरड्या जीवाला जगाचा निरोप घ्यावा लागला. या दुर्दैवी घटनेने राजगुरूनगर शहराच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाडा रस्त्यावर एका कापड दुकानासमोर भर दुपारी हा अपघात अनेकांनी पाहिला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोवळ्या जीवाचा काहीच दोष नव्हता असे म्हणत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. वडील दुचाकी चालवत होते. गर्दी असल्याने वाहने पुढे सरकत नव्हती. अशातच मागुन आलेल्या ट्रॅक्टरचा दुचाकीला (क्र एम. एच. १४ ई. एफ. ५७५२ ) धक्का बसला. पत्नीच्या हातातील मुलगी खाली पडली. काही कळण्याआधी ट्रॅक्टरचे चाक त्यावरून गेले. याबाबत वडील कैलास चिंतामण आढळ, (वय ३०,मुळ रा. कुडे, ता खेड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि २२) दुपारी तीन वाजता हा अपघात घडला.

ट्रॅक्टर बाबत चौकशी केली असता सदरचा ट्रॅक्टर हा विशाल भांबुरे , रा. भांबुरवाडी ता.खेड यांचा असल्याचे मला समजले व त्यानुसार मी पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती आढळ यांनी दिली आहे. पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. सखोल चौकशी करून चुक कोणाची यावरून तक्रार नोंदवली जात आहे, असे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी सांगितले.

राजगुरूनगर मधील वाडा रस्ता मोठ्या वर्दळीचा बनला आहे. शाळा,कार्यालय, दुकाने याबरोबरच हातगाड्या,अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंग यामुळे या रस्त्यावर वाहन चालवताना वेळ वाया घालवावा लागतो. याबाबत दै पुढारीने गेल्या पंधरा वड्यात सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. याशिवाय तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी स्वतः भर उन्हात रस्त्यावर उतरून ट्रॅफिक सुरळीत केले होते. तेव्हापासून रोज पंचायत समितीच्या चौकात पोलीस उभे आहेत. रस्त्यालगतची सरसकट अतिक्रमणे हटवल्यास आणि अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT