मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जुहू कोळीवाडा येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाच जण समुद्रात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचजण बुडाले. यातील एकाला स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र चार जण गायब असून नौदल व अग्निशमन दलामार्फत शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Juhu Beach)
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. तरीही सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास 12 ते 15 वयोगटातील मुले जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरले. समुद्रात तुफान असल्यामुळे उतरू नये, असा सल्ला स्थानिक नागरिकांनी दिला होता. पण स्थानिकांची नजर चुकवून ही मुले समुद्रात अर्धा किलोमीटर दूरवर पोहोचले. दरम्यान समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही मुले समुद्रात बुडाली. यातील एकाला स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले. सध्या या चौघांची जेटस्की, लाइफ जॅकेट वापरून शोध मोहीम सुरू आहे. (Mumbai Juhu Beach)
समुद्रात भरती-ओहोटीमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलिस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा