फ्रीटाऊन (सिएरा लिओन) : पुढारी ऑनलाईन : Blast in Africa : आफ्रिकन राष्ट्र सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत ९१ जणांचा मृत्यू झाला. स्फोटात अनेक लोक जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सिएरा लिओनच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी (NDMA) ने याची माहिती दिली.
फ्रीटाउनचे महापौर यव्होन अकी-सॉयर यांनी या अपघाताबाबत फेसबुकवर एक निवेदन जारी केले आहे. "बाय बुरेह रोड, वेलिंग्टन येथे झालेल्या स्फोटाबद्दल ऐकून दुःख झाले. इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या धडकेनंतर मोठा स्फोट झाला. आगीचे लोळ पसरले. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिक माध्यमांनी या घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये टँकरभोवती लोकांचे मृतदेह विखुरलेले दिसत आहेत, असं त्यांनी म्हटले आहे.
इंधन टँकरच्या स्फोटाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अकी-सॉएर म्हणाले की ही एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे. स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. दुर्घटनेत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगत महापौरांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी मदत कार्य करत आहेत.