पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या दक्षिण काशी पंढरपूर येथील विठ्ठलास श्रीकृष्णाचे रुप मानले जाते. आज (दि. ७) श्री विठ्ठल मंदिरात मंदिर समीतीच्यावतीने श्रीकृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बुधवारी रात्री 12 वाजता गुलाल उधळवून व गुलाबपुष्पाची उधळण करण्यात आली. याप्रसंगी श्री विठ्ठलास रेश्मी भरजरी कुंची परिधान करण्यात आली होती. तसेच पोळ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच मंदिरातील मुख्य सभामंडपात श्रीकृष्णाचा पाळणा बांधण्यात आला होता.
गोकुळाष्टीमीच्या उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भजन, किर्तन अशा पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमी मंदिरात रात्री उशिरापर्यंत साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या माधवी निगडे, शकुंतला नडगिरे आदीसह कर्मचारी, भाविक उपस्थित होते.