Latest

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला तडे; अद्भुत स्वर्गमंडप कोसळण्याची भीती

Shambhuraj Pachindre

खिद्रापूर (कोल्हापूर) : देविदास लांजेवार

कोल्हापूर जिल्ह्यात 2019 आणि 2021 साली आलेल्या विध्वंसक दोन महापुरांच्या तडाख्याने शिल्पकलेचा अद्भुत आविष्कार असलेल्या खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्रसिद्ध कोपेश्वर मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. कोपेश्वर मंदिराचा दर्शनी भाग असलेला आणि वास्तुरचनेतील चमत्कार समजल्या जाणार्‍या स्वर्गमंडपातील 20 खांबांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. यापैकी 6 खांब मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दिवसेंदिवस झुकत असून, हा अद्भुत स्वर्गमंडप केव्हाही कोसळू शकेल, अशी भीती पुरातत्त्व अभ्यासक आणि गावकरी व्यक्त करीत आहेत.

कृष्णा नदीच्या कुशीत काळ्या कातळातून अद्भुत शिल्पवैभव म्हणून साकारत गेलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर सुमारे अकराशे वर्षांपासून सौंदर्यशिल्पांना मिरवीत दिमाखात उभे आहे. चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी यांनी इ.स.च्या 7 व्या शतकात कोपेश्वर मंदिराची निर्मिती केली. तेव्हापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा 1660 पर्यंतचा कालखंड आणि सत्तापिपासू औरंगजेब बादशहाच्या या भागातील आक्रमणापर्यंतच्या भारतातील 7 राजवटींच्या इतिहासाचा साक्षीदार हे कोपेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील प्रेक्षणीय अतिसुंदर शिल्पवैभव म्हणजे येथील स्वर्गमंडप.

निळ्याशार आकाशाचा वेध घेणारे अप्रतिम अंतराळ गवाक्ष आणि अगदी तंतोतंत त्याच मापातील तळातील 13 फूट व्यासाची अखंड शिला असलेले हे स्वर्गमंडप 48 खांबांवर उभे आहे. मात्र, अनुपम शिल्पवैभव असलेल्या स्वर्गमंडपाचे 20 खांब दोन महापुरांनी जर्जर केले आहेत. 2019 सालच्या महापुरात हे मंदिर 13 दिवस बुडाले होते. मंदिराचे 80 टक्के स्तंभ (उंची) पुरात बुडालेले होते. त्यानंतर 2021 साली आलेल्या महापुरातही हे मंदिर बुडाले.

महापुराच्या पाण्यातील गाळ मंदिराच्या भिंती, सौंदर्यशिल्पे आणि शिलाखंडात खोलवर झिरपल्याने त्यावर थर साचले आहेत. त्यामुळे येथील मूर्ती आणि शिल्पे निस्तेज झाली आहेतच; परंतु सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे तो स्वर्गमंडपाच्या खांबांना. स्वर्गमंडपाचे 20 खांब दुभंगले आहेत. त्यांना भेगा गेल्या आहेत. या खांबांची दुरुस्ती होत नसल्याने दिवसेंदिवस खांबांच्या भेगा विस्तारत आहेत. आता तर भेगांमध्ये बोटे घुसतील एवढा 'स्पेस' निर्माण झाला आहे.

पुरातत्त्व खात्याकडे गावकर्‍यांची कैफियत…

2019 आणि 2021 च्या महापुरानंतर कोपेश्वर मंदिराचे पुजारी, खिद्रापूरचे प्रतिष्ठित नागरिक आणि पुरातत्त्व अभ्यासकांनी मंदिराच्या धोकादायक स्थितीवरून भारतीय पुरातत्त्व खात्याकडे कैफियत मांडली, ती अशी…

1) महापुरामुळे कोपेश्वर मंदिरातील सभामंडप आणि स्वर्गमंडपाच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत. पूर्वी मुसळधार पाऊस झाला तरी मंदिरात पाणी घुसत नव्हते. मात्र, आता अगदी छोटा पाऊस आला तरीही पावसाचे पाणी मंदिराच्या आतील भागात झिरपते.

2) झिरपणार्‍या पाण्यामुळे मंदिराच्या रेखीव आणि सुंदर भिंती, त्यावरील शिलाखंड आणि मूर्ती काळवंडल्या आहेत.

3) ज्या 48 खांबांवर स्वर्गमंडप उभा आहे. त्यापैकी 20 खांबांना भेगा पडल्याने ते धोकादायक बनले आहेत. यापैकी 5-6 खांब अतिधोकादायक असून, ते बाहेरच्या बाजूला झुकले आहेत. ते केव्हाही कोसळू शकतात, त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

पुरातत्त्व विभागाने काय केले?

खिद्रापूर येथील गावकरी, पुरातत्त्व अभ्यासकांच्या तक्रारीनंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी खांबावरील तडे गेलेल्या शिलाखंडांना तात्पुरत्या लोखंडी बंधपट्ट्या मारल्या आहेत. मात्र, हजारो टन वजनी पाषाणाचा भार या दुर्बल बंधपट्ट्या पेलू शकत नसल्याने खांबांना तडे जात आहेत आणि ते बाहेरील बाजूस झुकतच आहेत.

दुभंगलेले स्तंभ अतिजोखमीचे

कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडपाचे तडे गेलेले 20 स्तंभ धोकादायक आहेत. त्यापैकी 5-6 स्तंभ अतिजोखमीचे आहेत. ते केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे मंदिर तर कोसळेल; पण येथे येणार्‍या पर्यटकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
– प्रा. शशांक चोथे, पुरातत्त्व अभ्यासक, खिद्रापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT