कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या एका गटाच्या कार्यकर्त्याला कसबा बावड्यात युवकांनी बेदम चोप दिला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना कसबा बावडा चावडी परिसरात घडली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शनिवारी दुपारी कसबा बावड्यातील चावडी गल्लीत एक अनोळखी इसम बावडा येथील एका नागरिकाच्या दुचाकीवर बसून आला. चावडी गल्ली येथे संशयास्पद स्थितीत दुचाकीवरून आलेल्या या दोघांना बावड्यातील युवकांनी अडवले. अज्ञात व्यक्तीकडील बॅग काढून घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये असलेली खाकी पाकिटे होती. त्यानंतर काही वेळातच वेटाळे गल्ली येथेसुद्धा असाच प्रकार निदर्शनास आला. त्यावेळी संबंधित पैसे वाटणारी व्यक्तीची बॅग कार्यकर्त्यांनी काढून घेतली; पण व्यक्ती पळून गेली.