पुढारी ऑनलाईन डेस्क : Shreyas Iyer Injury : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या रुपात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण मधल्या फळीतील फलंदाज अय्यर हा दुखापतीमुळे उर्वरित कसोटींमधून बाहेर पडू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे.
हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने तर विशाखापट्टणम येथील दुसरी कसोटी भारताने जिंकली आहे. त्यामुळे सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. गुरुवारी (8 फेब्रुवारी) बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक होणार होती, मात्र ती झाली नाही. जर शुक्रवारी ही बैठक झाली तर त्यात महत्त्वाचे निर्णय घेऊन संघाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अय्यर मालिकेतून बाहेर पडल्यास निवडकर्त्यांना त्याचा जागी पर्यायी खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे. विशाखापट्टणम कसोटीत जडेजा आणि राहुलच्या रूपाने टीम इंडियाला यापूर्वीच दोन धक्के बसले होते. जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळू शकले नाहीत. तर विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. आता राजकोट येथील तिसऱ्या कसोटीत कोहली, जडेजा, राहुल आणि अय्यर यांच्या अनुपस्थितीनंतर टीम इंडिया कसे प्रदर्शन करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अय्यरला फॉरवर्ड डिफेन्स खेळताना पाठीमध्ये आणि मांडीत वेदना होत असल्याचे समजते आहे. दुसरी कसोटी संपल्यानंतर सर्व खेळाडूंचे किट राजकोटला नेण्यात आले. मात्र, अय्यरचे सामान त्याच्या घरी पाठवण्यात आल्याचेही वृत्त आहे. अय्यर सध्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे असून तो आता थेट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
अय्यर गेल्या 12 महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबादमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील कसोटीदरम्यान त्याच्या पाठीच्या दुखापतीत वाढ झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याच कारणामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. ज्यामुळे तो आशिया कप खेळू शकला नव्हता. पण विश्वचषकात त्याने चमकदार कामगिरी केली होती.