Latest

श्रावण विशेष : “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग”- जाणून घेऊया या मंदिराविषयी….

backup backup

[visual_portfolio id="283194"]

"त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग" हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. शिव शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी हे एक विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर या गावात स्थित आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या त्र्यंबकेश्वर येथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात येथे भाविकांचा ओघ अधिक वाढतो. श्रावणी सोमवार निमित्ताने लाखो भाविक येथे हजेरी लावतात.

सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात ही 1755 मध्ये झाली. 1786 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जून्या मंदिराच्या जागीच नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचे पुननिर्माण केले. त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून केले जाते.

त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. येथील शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच "ब्रह्मा-विष्णू-महेश" विद्यमान आहेत. गोदावरी नदीचा उगमही येथेच झाला आहे. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. येथेच निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे.  मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतभरातून हजेरी लावतात. त्याचबरोबर अनेक धार्मिक संस्था येथे कार्यरत आहे. वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था येथे आहेत. स्थानिक माहितीनुसार, येथे ज्योतिर्लिंगावर "त्रिकाल पूजा" केली जाते जी ३५० वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

येथील ब्रह्मगिरी पर्वताला पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व आहे. पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवांनी श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी याच पर्वतावर तप केले.  या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुढग्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्रम्हगिरीवर शंकराच्या जटा पाहण्यासाठी आवर्जून भाविक येत असतात.

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधीसाठी भाविक येत असतात.  कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ असे विविध विधी येथे होतात. त्यातही खासियत म्हणजे येथे केली जाणारी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होते. या सर्व पूजा व विधी भाविकभक्तांच्या वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी केल्या जातात.

या मंदिरात महाशिवत्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक महाशिवरात्रीला भाविक भक्त येथे अलोट गर्दी करत असतात. या उत्सवात त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसवून फिरवला जातो. हा मुकुट म्हणजे या उत्सवाचे प्रमुख आकर्षणच असते.  पालखीमध्ये बसवून फिरवून झाल्यानंतर  कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते व त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT