नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस चार्यासाठी गेलेला आहे. साखर कारखाने सुरू होऊन जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसर्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. 'गेटकेन'चा असा ऊस मिळविण्यासाठी कारखाने अनेक फंडे वापरत आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ऊस चार्यासाठी गेलेला आहे. साखर कारखाने सुरू होऊन एक महिनाच झालेला आहे, तोच कारखान्यांना उसाची कमतरता जाणवू लागल्याने उसाच्या पळवापळवीस सुरुवात झाली आहे.
संबंधित बातम्या :
दुसर्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस मिळवताना साखर कारखाने वेगवेगळे फंडे वापरत आहेत. पाहुण्यांचे पाहुणे शोधून त्यांचा ऊस मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. जास्त बाजारभाव अथवा थेट काटा पेमेंट असाही फंडा वापरला जातोय. यातूनही ऊस मिळविण्यासाठी काही अडचण निर्माण झाली तर ऊस तोडणीस परिपक्व होण्याच्या अगोदरच आम्ही तोडून नेऊ, पण आम्हाला ऊस द्या, असेही प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.
कोवळा ऊस तोडून साखर उतार्यावर परिणाम होत असला तरी आपल्या कारखान्याचे जास्त गळीत व्हावे म्हणून कोणताही म्हणजेच कमी साखर उतारा असलेला ऊस तोडून नेत आहेत. ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांचे शेतकी अधिकारी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या सोबत घेऊन कार्यक्षेत्राबाहेर उसासाठी भटकत आहेत. काही ठिकाणी तर एका साखर कारखान्याकडे नोंदलेला व करार केलेला ऊस दुसराच कारखाना तोडून नेत आहे. उसाची कमतरता अशीच राहिली तर साखर कारखाने चालविणे अवघड होऊन बसणार आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस घेण्यास साखर कारखान्यांना पुन्हा बंदी करण्याची वेळ येणार असून, शासनाला झोनबंदी पुन्हा लागू करावी लागू शकते.
पुढच्या वर्षीही संकट कायम
दरम्यान यंदा उसाची लागवड कमी झाली असून पुढील 2024 – 2025 गळीत हंगामासाठी उसाची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण होणार आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा फक्त आडसाली उसाची लागवड झाली आहे. पूर्वहंगामी उसाची लागवड अत्यल्प असून, खोडवा ऊस कमी राहणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी उसाचे संकट मोठे असणार आहे