exam 
Latest

कॉपी तपासण्याच्या निमित्ताने विद्यार्थिनीची सर्वांसमोर तपासणी, गोव्यातील धक्कादायक प्रकार

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  चेन्नई येथे राष्ट्रीय प्रवेश व पात्रता चाचणी परीक्षेवेळी विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. असाच एक धक्कादायक व किळसवाणा प्रकार सीमॅट म्हणजे सामान्य व्यवस्थापन प्रवेश चाचणी परीक्षेवेळी मडगावात घडला आहे. मडगावातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात ही घटना 4 मे रोजी घडली असून या किळसवाण्या प्रकारामुळे भेदरलेली विद्यार्थिनी अद्याप त्या धक्क्यातून सावरलेली नाही.

मडगाव येथील एका महाविद्यालयात सीमॅट परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ज्या महाविद्यालयात गोव्यातील विद्यार्थी परीक्षा देत होते त्या केंद्रात हा प्रकार घडला आहे. कॉपी (नक्कल) तपासण्याच्या निमित्ताने महिला पर्यवेक्षकांनी थेट त्या विद्यार्थिनीच्या अंतर्वस्त्रात हात घालून तपासणी केली. हा प्रकार इतर विद्यार्थ्यांसमोर घडला. या प्रकारामुळे लज्जीत झालेल्या व घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने त्या पर्यवेक्षकाला अशाप्रकारे आपली झडती घेऊ नका, असे सांगितले पण तिने तिचे म्हणणे ऐकून न घेता सर्वांची अशाचप्रकारे तपासणी केली जाते, असे सुनावले. सर्वांसमक्ष हा प्रकार घडल्याने त्या विद्यार्थिनीला खजील होऊन परीक्षा द्यावी लागली. आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर दैनिक पुढारीला तिने ही माहिती सांगितली. परीक्षा केंद्रात येणार्‍या प्रत्येक विद्यार्थिनीला शेजारील वर्गात नेऊन तपासले जात होते. त्यावेळी बरेच विद्यार्थीही तिथे उपस्थित होते, अशी माहिती तिने दिली. आपण पालकांना या विषयी माहिती दिलेली आहे. पण अजून पोलिस स्थानकात तक्रार नोंदवलेली नाही, असे ती म्हणाली.

आमचे काहीच देणेघेणे नाही :  प्राचार्यांची भूमिका

संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता, आम्ही केवळ त्या परीक्षेसाठी आयोजकांना वर्ग उपलब्ध करून दिले होते. त्या परीक्षेसाठी पर्यवेक्षण करण्यासाठी गोव्याबाहेरून शिक्षक आले होते. त्यांच्याशी आमचे काहीच देणेघेणे नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT