Latest

शिवसेनेतून फुटलेल्या 11 आमदारांसह नऊ खासदारांच्या चौकशा थांबविल्या; खा. संजय राऊत यांचा आरोप

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : माझ्या आरोपांकडे सरकार दुर्लक्ष करते आहे. हे सरकार भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालते आहे. तसे नसते तर ज्यांना ईडी, सीबीआयने समन्स काढले आहेत, त्यांच्या चौकशा थांबवून त्यांना शुद्ध करून आपल्या पक्षात त्यांनी घेतले नसते. शिवसेनेतून फुटलेले 11 आमदार, नऊ खासदार यांना ईडी, सीबीआयचे समन्स आहेत, त्यांचे खटले थांबवले आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

'उद्धव ठाकरे किस झाड की मूली', अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यासंबंधी खासदार राऊत म्हणाले, कोण नवनीत राणा! परत त्या निवडणुकीला उभ्या राहू द्या. मग अहंकार काय, कोण कोणत्या झाडाची मुळी हे कळेल. आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरच त्या निवडून गेल्या आहेत. माझ्याकडे त्यांच्याविषयी असलेल्या माहितीनुसार त्या आरोपी आहेत. अशा व्यक्तीने उद्धव ठाकरेंवर काय बोलावे, आम्ही योग्य वेळी पाहून घेऊ.

ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सध्या जे काही न्यायमूर्ती आहेत, त्यांना महाराष्ट्र रामशास्त्री बाण्याचे म्हणतो, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य खूप काटेकोरपणे घेतात. केरळमधील चॅनेलने दिल्ली दंगलीविषयी सत्य दाखवले. त्या वेळी इतर सगळे चॅनेल बोटचेपी भूमिका घेत होते. म्हणून त्या चॅनेलवर बंदी आणली. ही हुकूमशाही आहे. त्याला पायबंद घालणारा निर्णय न्यायालयाने देत आशेचा किरण दाखवला आहे.

सीमावर्ती भागातील प्रश्नासंबंधी राऊत म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये जर मराठी बाणा, स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सीमा भागातील नागरिकांना न्याय द्यावा. त्यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी त्या भागात जाऊन उत्तर द्यावे. सीमाभागात त्यांनी जायला पाहिजे. तेथील सर्व उमेदवार त्यांनी निवडून आणले पाहिजेत. तर ते महाराष्ट्राच्या आईचे दूध प्यायलेत, असे आम्ही म्हणू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT