पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि माझी पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांचे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निम्हण 1999 मध्ये पहिल्यांदा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातुन आमदार झाले. कट्टर नारायण राणे समर्थक म्हणून ओळखले जात असलेल्या निम्हण यांनी राणे यांच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009 काँग्रेसकडून आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले. त्यांच्याकडे पुणे शिवसेना शहर प्रमुखांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोडल्यानंतर ते राजकारणात सक्रिय नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र, निम्हण हे सेनेतच कायम राहिले. त्यांनी उभारलेल्या सनीज वर्ल्ड मध्ये सक्रिय होते.
बुधवारी दुपारी त्यांनी कुटुंबियासमवेत पाडवा कार्यक्रम साजरा केला. मात्र, त्यांना अचानक छातीत दुखू लागले. हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रात्री नऊ वाजता पाषाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.