Latest

आ. शिवेंद्रराजे ना. अजित पवारांना भेटले, साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा – जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याची इच्छा बोलून दाखवली. अजितदादांनीही तुम्ही बँक चांगली चालवली आहे. त्यामुळे तुमच्या इच्छेबाबत ना. रामराजे व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून घेतो, असे आ. शिवेंद्रराजेंना सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर दि. 6 डिसेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड आहे. सद्य:स्थितीत आ. शिवेंद्रराजे भोसले व नितीनकाका पाटील बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. पैकी नितीनकाकांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली होती.

स्वत: नितीन पाटील यांनी मात्र अद्यापही जाहीर इच्छा व्यक्त केलेली नाही तर शिवेंद्रराजे यांनीही आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे गुरुवारपर्यंत गुलदस्त्यात ठेवले होते. गुरुवारी मात्र आपल्या सर्व समर्थकांशी चर्चा करून आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी काय काय घडले? निवडणुकीत काय काय घडले? याबाबतची सविस्तर माहिती आ. शिवेंद्रराजेंनी ना. अजितदादा पवार यांना दिली. त्याचवेळी बँकेची सद्य:स्थिती, सुरू असलेली वाटचाल याबाबतही शिवेंद्रराजेंनी माहिती दिली.

यावर बँक आपण चांगली चालवली असल्याची शाबासकी ना. अजितदादा पवार यांनी आ. शिवेंद्रराजेंना दिली. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असून सर्वांना बरोबर घेवून बँक पक्षविरहित ठेवून कामकाज चालवल्यामुळेच आज बँकेचा नावलौकिक आहे. आपण पुढेही संधी दिली तर बँक आणखी वेगाने पुढे नेवू, असे सांगत आ. शिवेंद्रराजेंनी बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची जाहीर मागणीच केली. त्यावर अजितदादांनीही संमती देत आपण विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय करू, असे आ. शिवेंद्रराजेंना सांगितले.

उपाध्यक्षपदासाठी कोण कोण इच्छुक आहे? असा प्रश्न ना. अजितदादांनी शिवेंद्रराजेंना विचारला त्यावर शिवेंद्रराजेंनी अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, दत्तानाना ढमाळ व आणखीही काहीजण इच्छुक असल्याचे सांगितले. पाठीमागे उपाध्यक्ष कोण होते? असाही प्रश्न अजितदादांनी विचारला तेव्हा आ. शिवेंद्रराजेंनी सुनील माने असे सांगताच अजितदादांनी 'तरीही?' एवढेच वाक्य उच्चारले. शिवेंद्रबाबा, कोरेगाव व खटावच्या जागा जायला नको होत्या. चांगल्या माणसांचे त्यामुळे खच्चीकरण होते, अशी खंतही ना. अजितदादांनी शिवेंद्रराजेंसमोर बोलून दाखवली. शिवेंद्रराजे व अजितदादांमध्ये आणखीही अन्य विषयांवर खासगीत चर्चा झाल्याचे समजते.

ना. रामराजे खा. शरद पवार यांना भेटले

एकीकडे आ. शिवेंद्रराजे भोसले हे ना. अजित पवार यांना भेटले असतानाच दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना जाऊन भेटले. ना. रामराजे व ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांनी संपूर्ण निवडणुकीत कोण कुठे चुकले, याची जंत्रीच पवारांसमोर मांडली. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाबाबतचे ठोकताळेही दोघांनी पवारांसमोर सादर केले. बँकेची असलेली आदर्शवत वाटचाल टिकवायची असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाणारे चेहरे हवेत, असे तिघांनीही पवारांना सांगितले. पवारांनीही सर्व बाजू ऐकून दि. 6 रोजी आपण निर्णय देऊ, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT