कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुरोगामी कोल्हापुरात सर्व जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना दंगलीच्या माध्यमातून पुरोगामी कोल्हापूरवर लागलेला डाग कोल्हापूरकर लवकर पुसून टाकतील, असा विश्वास शाहू महाराज यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे आयोजित शिव-शाहू सद्भावना यात्रेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. शाहू समाधी स्थळास अभिवादन करून या यात्रेस सुरुवात झाली.
छत्रपती शाहू महाराज यांच्या समतेच्या विचारांची कोल्हापूरला परंपरा आहे, असे सांगून शाहू महाराज म्हणाले, काही जातीयवाद्यांनी पुरोगामी कोल्हापूरच्या समतेच्या विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. शंभर वर्षात घडले नाही, असा प्रकार घडल्याने कोल्हापूरला डाग लागला. मात्र लवकरच हा डाग पुसून पुरोगामी कोल्हापूर ही ओळख कायम राहील. कोल्हापूर हे जातीयवाद्यांचे टार्गेट आहे. मात्र कोणी कितीही प्रयत्न केला तरी कोल्हापूरची पुरोगामी ओळख कधीही पुसली जाणार नाही. समतेचा विचार जगभर पोहचविण्यासाठी आपण हा विचार कृतीतून पुढे नेला पाहिजे.
कोल्हापूरसह राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा होत असताना, कोल्हापूरसह राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडले. मोबाईलवर औरंगजेबाच्या समर्थानाचे स्टेट्स लावण्यावरून घटना घडली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली. या मुलांच्या पालकांचीही जबाबदारी आहे. त्याबरोबरच या मुलांना आणखी कोणी प्रोत्साहन दिले का? बाहेरून हस्तक्षेप होतोय याचीही चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा गैरफायदा घेऊन काहींनी वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास केला पाहिजे.
आ. हसन मुश्रीफ म्हणाले, सद्भावना यात्रेच्या माध्यमातून त्या घटनेने झालेल्या कोल्हापूरच्या बदनामीस चोख उत्तर दिले. छत्रपती शिवरायांनी कोणत्या जाती धर्माविरोधात नव्हे, तर स्वराज्यासाठी लढाई केली. शिवरायांच्या दरबारात 22 सरदार मुस्लीम होते. मग मावळे किती असतील, याचा विचार करा. औरंगजेब हा आपल्या सर्वांचाच शत्रू आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र याचा आधार घेऊन कोल्हापूरची पुरोगामी ओळख पुसण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. राजर्षी शाहू महाराज यांनी एकीचे चित्र देशाला दाखविले. ते नसते तर आम्ही घडलो नसतो.
आ. सतेज पाटील म्हणाले, अशा घटनांच्या माध्यमातून कोल्हापूरची प्रगती, विकास थांबविण्याचा प्रयत्न होत आहे का, याचा विचार करणे सर्वांची जबाबदारी आहे. या घटनेनंतर पालकमंत्र्यांनी परजिल्ह्यातून लोक आल्याचे वक्तव्य केले होते. मग त्याची चौकशी झाली पाहिजे. बाहेरून कोकणातून, सांगलीतून लोक आले का? याचा शोध घ्यावा. बाहेरून लोक आले तर मग नाकाबंदी का केली नाही? दुर्लक्ष का केले? शाहू महाराज यांना का बोलाविले नाही? अशी विचारणा आ. पाटील यांनी केली. कोल्हापूरची पुरोगामी ओळख कायम राखण्यासाठी सद्भावना यात्रेपुरते न थांबता, सोशल मीडियावर येणार्या चुकीच्या मेसेजना चोख उत्तर दिले पाहिजे.
राजर्षी शाहू महाराज यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असे सांगून माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर पुरोगामी नाही म्हणणार्यांनो, तुमच्याकडे आर्थिक, शैक्षणिक सक्षमता कशी आली याची जाणीव नसेल तर कृतघ्न ठराल. राज्यघटना आणि सामाजिक समतेचा विचार हाच सर्वसामान्यांना आधार आहे. सोशल मीडियावरील अशा कृत्यांसाठी सक्षम कायदा केला पाहिजे.
आ. पी. एन. पाटील म्हणाले, कोल्हापुरात दंगलीमागे कोण आहे? कोल्हापूर बंदमागे दंगलीचा हेतू होता का? याचा शोध घेऊन तपास केला पाहिजे. दगड-विटा कुठून आल्या? अशी विचारणा करून आ. पाटील म्हणाले, राज्याभिषेकदिनी दंगल का झाली? दंगल घडवायचीच होती का? या सर्वांचा तपास केला पाहिजे.
सद्भावना यात्रेच्या सुरुवातीस हातात भगवा आणि तिरंगा ध्वज घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. जयश्री जाधव, माजी आमदार संजय घाटगे, मालोजीराजे छत्रपती, इंद्रजित सावंत, यशराजराजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती.
भारती पोवार यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, कॉ. चंद्रकांत यादव, बाबुराव कदम, उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, तौफिक मुलाणी, मेधा पानसरे, संदीप देसाई, राजेश लाटकर, गिरीश फोंडे, दिलीप देसाई, अतुल दिघे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, बबन रानगे, विक्रांत पाटील-किणीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यात्रेत लहान मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांचे पोस्टर घेऊन मुलींनी हजेरी लावली. एक मुलगी डोक्यावर तिरंगा घेऊन नातेवाईकाच्या खांद्यावर बसून यात्रेत सहभागी झाली. हातात भगवे ध्वज घेऊन अनेक मुले सहभागी झाली.