नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटुन एक देश एक निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. लोकसभेमधील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेवुन या संदर्भातील निवेदन दिले. तसेच २०२९ पासुन एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सुचनाही त्यावेळी करून दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एक देश एक निवडणुकीसंदर्भात तयार केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीरंग बारने, खासदार राजेन्द्र गावित, आशिष कुलकर्णी, केदार जोशी यांचा समावेश होता. शिंदे गटाने एक देश एक निवडणुकीला पाठिंबा देताना काही सुचनाही नमुद केल्या आहेत.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान राहुल शेवाळेंनी एक देश एक निवडणुकीला बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता, असे सांगितले. दरम्यान, आगामी २०२६ ला होणारी मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर २०२९ पासुन एक देश एक निवडणुकीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सुचनाही यावेळी त्यांनी केली.