Latest

अध्यक्षांचा निकाल शरद पवारांसाठी धोक्याची घंटा

दिनेश चोरगे

मुंबई :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची, याचा निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि याचिकांमधील दावे-प्रतिदावे हे समान असल्याने राष्ट्रवादीबाबतही याच निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेत कोणतीही फूट पडली नसून, आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. विधानसभा अध्यक्षांनी हा दावा मान्य करत शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. तसेच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनाही वैध ठरवत शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरविले.

अजित पवार यांनीही राष्ट्रवादीचे 40 आमदार फोडून महायुती सरकारमध्ये सामील होताना आपला पक्ष हाच खरी राष्ट्रवादी असल्याचे सांगत पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. तसेच अजित पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे परस्परांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. शिवसेनेतील वादावर निकाल दिल्यानंतर आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर निर्णय देऊ शकतात. मात्र, निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेला निकाल हा अजित पवार गटाच्या पथ्यावर पडणारा आहे.

शिवसेनेबाबत जो निकाल आला तसाच निकाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात राष्ट्रवादीबाबत लागू शकतो, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू झाली आहे. अजित पवार गटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधानसभा प्रतोद अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT