Latest

अकोले: शासकीय आश्रम शाळेतील मुलांना मारहाण करणारा अधीक्षक निलंबित, राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा : शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेचे अधीक्षक अश्विनकुमार पाईकराव यांनी जळत्या लाकडाने पाच विद्यार्थ्यांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात जखमी मुलांच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील शिरपुजे शासकीय आश्रम शाळेत ३ डिसेंबर रोजी सहा विद्यार्थ्यांनी लाकडे पेटवून शेकोटी केली होती. हा प्रकार अधिक्षक अश्विन पाईकराव यांनी पहताच जळती लाकडे हातात घेऊन सहावी ते नववीच्या मुलांना मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या होत्या.

या नंतर पालकांनी मुलांना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सदर घटनेची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांना समजताच त्यांनी राजुर ग्रामीण रुग्णालयात जाऊन माराहाण झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच अधीक्षक अश्विन पाईकराव यांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली होती.

दरम्यान राजूर पोलिस ठाण्यात पालक भाऊ शिवराम धादवड (वय-३२ वर्ष, रा,शिसवद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अधीक्षक अश्विन पाईकराव यांच्या ताब्यातील मुलांनी मुख्याध्यापक यांच्या सांगण्यावरून शाळेच्या आवारातील जुन्या गाद्या पेटवल्याचा राग आरोपी पाईकराव यांना आला. त्यानंतर त्यांनी युवराज भाऊ धादवड, अशोक संतू धादवाड, ओमकार भीमा बांबळे, गणेश लक्ष्मण भांगरे, बाबू संतू धादवड या पाच मुलास शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. या फिर्यादीवरून अश्विनीकुमार अर्जुनराव पाईकराव (रा. शासकीय आश्रम शाळा, शिरपुंजे) यांच्या विरोधात भा.द.वि.कलम ३२४,५०४ व बाल अधिनियम २००० चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मुढे करीत आहे.

आश्विनकुमार अर्जुनराव पाईकराव यांनी सरनामा क्रमांक ६ च्या अहवालानुसार म.ना.से. वर्तणुक १९७९ मधील नियम ३ चा भंग करत कर्तव्यात कसूर केल्याने प्रथमदर्शनी जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नियम १९७९ मधील नियम ४ चा पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आश्विनकुमार पाईकराव यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करीत आहे.

– संदिप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT