चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रशासन दरबारी मागण्यांची पूर्तता न झाल्याने चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील शिंदोला गावातील नागरिकांनी येत्या लोकसभेसह विधानसभा व अन्य निवडणुकींवर बहिष्कार टाकला आहे. गावातील हनुमान मंदिराजवळ झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.
यापूर्वी शासनाचे अधिकारी, उपविभागिय अधिकारी डॉ. शरद जावळेकर, एसडीपिओ संजय पुजलवार, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या मागण्या समजून घेत बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांना केले होते. परंतु जोपर्यंत ३३१ शेतकऱ्यांचा जमिनीचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत आम्ही बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहोत, असे ग्रामस्थांनी शासन व अधिकाऱ्यांना सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीवर जाहीर बहिष्कारचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिंदोला येथील शेती ही माहुर देवस्थानची असून येथील शेतीवर मिळणाऱ्या सुविधांपासून ग्रामस्थ वंचित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही जमीन पिढीजात वाहत असून शासनाला वेळोवेळी निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना शेतीवर बँक कर्ज घेण्यासाठी तसेच यावर सातबारा वर देखील १९५७ चे कूळदेखील शासनाने काढले आहे. सात बारावर शेतकऱ्यांचे नाव येत नाही. याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नसल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
जमिनी नावावर होणे, शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता आला पाहिजे, याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामूळे 19 एप्रिल ला होवू घातलेल्या लोकसभेसह येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान सभा, बाजार समिती व अन्य स्थानीक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.