नारायण राणे 
Latest

सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी; नारायण राणेंचे काम करण्यास नकार!

दिनेश चोरगे

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली. विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका, निवड समितीत आपल्याला भाजपाने विश्वासात घेतले नाही, अशा शब्दांत शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजप नेते तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणुकीत नारायण राणेंचे काम न करण्याचे सांगण्यात आल्याचे समजते, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली ही समन्वय समितीची बैठक अर्ध्यावरून गुंडाळावी लागली. आता याबाबत पुन्हा २३ एप्रिलला कुडाळ आणि कणकवली येथे समन्वय समितीची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कुडाळमधील शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आज (दि.२१) झाराप येथे भाजप नेते तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, उद्योजक किरण सामंत यांच्यासह कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड व वैभववाडी या पाच तालुक्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

वैभववाडी तालुक्यातील कुर्ली घोणसरी येथील काही विकास कामे रद्द होण्यासाठी तेथील स्थानिक आमदारांनी कसे प्रयत्न केले, त्याठिकाणचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून खाली उतरवण्याचे प्रकार सुध्दा घडले. याबाबत शिंदे शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जोपर्यंत भाजपकडून ठोस निर्णय देण्यात येत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे काम आम्ही करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिंदे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांसमोर घेतली. तसेच या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी म्हणून किरण सामंत असावेत, अशी मागणी शिंदे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात निधी वाटप करताना भाजपकडून भेदभाव करण्यात आल्याचे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगून नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT