पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यातील सासवड येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच या दरम्यान त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. हा कार्यक्रम चालू असताना एक मजेशीर घटना घडली.
आपली समस्या मांडण्यासाठी आलेल्या या कार्यक्रमात एका नागरिकाने खासदार शरद पवारांना उद्देशून म्हटलं, "साहेब, गेल्या दहा वर्षांच्या काळात तुम्ही दोनदा माझ्या स्वप्नात आला होतात" हे ऐकून शरद पवारांनी संबंधित नागरिकास विचारलं की, "हे स्वप्न पहाटे पडलं होतं की मध्यरात्री?" शरद पवारांच्या या उलट प्रश्नानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला. यानंतर पवारांनी संबंधित नागरिकाची समस्या जाणून घेतली आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याशी चर्चा करून संबंधित समस्या सोडवण्याची सूचना दिली.