Latest

राजकीय पीचवरील अष्टपैलू खेळाडू म्हणजे फक्त शरद पवार : धनंजय मुंडे

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजकारणाच्या पीचवर कधीही चमत्कार दाखवण्याची धमक ८२ वर्षाच्या साहेबात आहे. म्हणूनच आतापर्यंत त्यांच्याशी कोणीही अन् कुठेही नाद करण्याच्या फंदात पडत नाही, असे मत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुण्यात व्यक्त केले.

क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीवर आधारित पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुंढे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, शांताराम जाधव, श्रीरंग इनामदार, आमदार चेतन तुपे, शकुंतला खटावकर, रुस्तमेहिंद अमोल बुचडे, काका पवार, ऍड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अंकुश काकडे हे उपस्थित होते.

मुंडे पुढे म्हणाले, शरद पवार हे चालतं बोलत विश्वविद्यापीठ आहे. ऊसतोड मजुरापासून ते जागतिक साखरेच्या बाजार पेठेपर्यंत आणि सुई पासून विमानापर्यंत माहिती असणारा जगाच्या पाठीवर असा दूरदृष्टी असलेला नेता नाही. त्यामुळेच या 82 वर्षाच्या खेळाडूचा कुठलाही खेळाडू नाद करत नाही. राजकारणात व्हत्याच न्हवतं करण्याची त्यांच्यात धमक आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोठे काम उभे केले आहे. अनेक खेळांना प्रसिद्ध करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले न्हवे तर ते पूर्ण केले.

देशी खेळ आणि खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी शरद पवार यांनी भरीव काम केलेले आहे. खेळाडूंचा आत्मसन्मान जाणणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. क्रिकेटपटू चंदू बोर्डे म्हणाले, माझ्या जीवनात पवार यांचे योगदान आहे. क्रिकेटला मोठा दर्जा मिळाला त्यामागे पवार यांचेही मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे खेळाडूंना पेन्शन सुरू केली.

रुस्तुम ए हिंद अमोल बुचडे म्हणाले, शरद पवार यांचे खेळांबद्दल व त्या क्षेत्रातील पदाधिकारी व खेळाडूंशी असलेले बॉंडिंग पाहिले. मैदानावर होणारा गेम आणि संघटनेत गेल्यावर सुरू होणारा गेम यामध्ये खेळ पुढे जाण्यासाठी आणि संघटन मजबूत होण्यासाठी कार्यशाळा व्हायला हव्यात.

अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव म्हणाले, पवार राजकारणात व क्रीडा क्षेत्रात ही जाणता राजा म्हणून ओळखले जातात. कबड्डीचा प्रचार आणि प्रसार ३५ देशांमध्ये करण्याचे काम त्यांनी केलं. यासाठी मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली. आज प्रो कबड्डीतून खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळू लागले. अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहे. माझ्या सारख्या झोपडपट्टीतील खेळाडू अर्जुन पुरस्कारा पर्यन्त पोहोचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT