स्थापन केलेल्या पक्षाची शकले उडल्यानंतरही हार न मानता महाराष्ट्र पिंजून काढत चौर्यांशीचा योद्धा असलेले शरद पवार दोन दिवस (मंगळवार, बुधवार) शिर्डी मुक्कामी येत आहेत. या काळात ते निष्ठेची ज्योत तेवत ठेवण्यासोबतच लोकशाही संरक्षणाची साद घालत आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत. भाजपचे मातब्बर नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील आश्वी गावातील कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती हा योगायोग, की राजकीय गोळाबेरजेचा भाग, याकडे नगरचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे पवारांच्या दौर्याचे नियोजन करत असल्याने विखेंच्या कोंडीसाठी पवार कोणता डाव टाकणार, याकडे सार्यांच्या नजरा लागून आहेत.
रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमाला पवारांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरणारी अशीच आहे. गतवर्षीही राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय शिबिर शिर्डीत झाले होते. यंदा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिले शिबिरही त्याच शिर्डीत होत आहे. नेहमीच शरद पवारांना पाठबळ देणार्या नगर जिल्ह्यातील सहापैंकी चार आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली अन् अजित पवारांची संगत केली. केवळ दोन आमदार सोबत असतानाही शिर्डीच्या मातीतून 'नगरी डाव' आखत अनेकांना चितपट करण्याची तयारी पवार यानिमित्ताने करणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राजकारणात नेहमीच धक्का देणारे शरद पवार विखेंची विकेट घेण्याकरीता श्रद्धा व सुबरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या नगरीतून कोणती गुगली टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विद्यार्थिदशेत शरद पवारांनी प्रवरानगरला म्हणजे विखेंच्या अंगणातच पहिले आंदोलन (1956) केले होते. (अर्थात ते विखेंच्या विरोधात नव्हते, तर ते होते गोवा मुक्तिसंग्रामातील आंदोलन.) पुढे पवार राजकारणातील प्रभावी नेते झाले. नगर जिल्ह्यातील तीन चतुर्थांश आमदारांनी साथ सोडली, तर पवार आजही नगरच्या राजकीय पटलावरील कमांड ढिली झाल्याचे मानायाला तयार नाहीत. किंबहुना, कमांड आपलीच आहे, हे सिद्ध करण्याचाच प्रयत्न ते शिर्डी मुक्कामी करतील, असे मानले जाते. विखे-पवार घराण्यातील राजकीय वैमनस्य सर्वांनाच ज्ञात आहे. एका पक्षात असूनही राजकीय द्वंद असणारे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षही आता वेगवेगळे झाले आहेत. तेच थोरात आता पवारांच्या आश्वीतील कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. पवार ज्यांच्यासाठी आश्वी गावात जात आहेत, ते बाळासाहेब गायकवाड हे रिपाई (आठवले गट) नेते आहेत. शिर्डी लोकसभेची जागा राखीव असल्याने पवार पोटातले ओठावर आणतील का?, याच दृष्टीने पवारांच्या दौर्याकडे पाहिले जात आहे. तब्बल सात वेळा बाळासाहेब विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (तत्कालीन कोपरगाव मतदारसंघ) प्रतिनिधित्व केले. विखेंच्या कलानेच शिर्डीतून दिल्लीचा रस्ता सुकर होत असल्याचा आजवरच अनुभव पाहता शरद पवार हे विखेंची वाट बिकट करण्यासाठी कोणती नवी समीकरणे तयार करतात, याकडेच सर्वांचेच लक्ष लागून आहे.
शिर्डी व अहमदनगर असे लोकसभेचे दोन मतदारसंघ नगर जिल्ह्यात आहेत. आघाडीतील जागावाटपात शिर्डीची जागा काँग्रेसकडे, तर नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. नगरमधून आ. नीलेश लंके यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात असतानाच पक्षफुटीत ते अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर उमेदवारीचा सस्पेन्स आजही कायम आहे. मात्र विखे उमेदवार असतील तर लोकसभा लढणारच, असा आ. लंके यांचा होरा आजही कायम आहे. आता पवार लंकेना पुन्हा पसंती देणार की नवख्याला संधी देण्याच्या दिशेने पाऊल टाकणार हे पाहावे लागेल. शिर्डी दौर्यात पवार नगरच्या उमेदवाराची चाचपणी करण्यासोबतच आगामी निवडणुकांची रणनीतीही आखतील; पण विखेंच्या वाटेत कोणते अडथळे उभे करतील, हे पाहावे लागेल.
पवारांचा दौरा योगायोग की राजकीय गणिते!
पुलोदचा प्रयोग केल्यानंतर नगर जिल्ह्यातील सहकारातील नेतेही दोन काँग्रेसमध्ये विभागले गेले. त्यानंतर बाळासाहेब गायकवाड यांच्याच आग्रहाखातर 1984 मध्ये शरद पवार पहिल्यांदा आश्वी गावात आले होते. आताही त्याच गायकवाड यांच्या अभीष्टचिंतनाला शरद पवार येत आहेत. विखेंचे राजकीय विरोधक असणारे आ. थोरात त्या कार्यक्रमाचे सगळे नियोजन करत आहेत, हा योगायोग नक्कीच नाही. त्यामागे काही गुपिते दडली आहेत, हे नक्की. ही गुपिते शरद पवार उघड करणार की त्यादृष्टीने इशारे देणार हे पाहावे लागेल. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांनीही 'शिर्डीत पुन्हा येईन' असे पूर्वीच सांगितलेच आहे. या पार्श्वभूमीवर पवार काय बोलणार याकडे सार्यांचे लक्ष असेल.
'गणेश'चा ट्रेलर; पिक्चर क्लिअर!
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेतून विखेंना पायउतार करत आ. बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या होमपीचवरच झटका दिला. विखे विरोधकांची मोट बांधण्यात यानिमित्ताने थोरात यशस्वी झाले. गणेश निवडणुकीचा 'ट्रेलर' मानून आ. थोरातांना 'पिक्चर क्लिअर' होण्याचे संकेत मिळाल्याने त्यांचे मनोधैर्य वाढले. भाजप पक्षांतर्गत काही नाराज आ. थोरात यांनी हेरून आहेत. याशिवाय जिल्हाभरात विखुरलेल्या सोयर्याधोयर्यांच्या माध्यमातून विखेंच्या कोंडीचे प्रयत्न आ. थोरातांकडून सुरू असतानाच त्यांना आता शरद पवारांचे बळ मिळणार असल्याने विखेंसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, असा कयास राजकीय जाणकारांकडून व्यक्त होतो आहे. कोणी काहीही अंदाज बांधत असले तरी लोकसभेचे घोडामैदान जवळच आहे. तोपर्यंत विखे-थोरात संघर्षाची चर्चा जिल्हाभरात होणारच आहेे!