मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (दि. १०) मुंबईत बोलावलेल्या बैठकीला केवळ १० आमदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत ४२ आमदारांची ताकद असल्याचे उघड झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला होता. त्यावर पलटवार म्हणून शरद पवार गटानेही मंत्रिपदाची शपथ घेतलेले ९ आमदार वगळता उर्वरित आमदार आमच्याकडे असल्याचा दावा केला होता. अजित पवार यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले होते. आज या घटनेला अडीच महिने होत आले, तरी या पत्रात किती आमदारांची नावे आहेत, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा दावा फुसका असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शरद पवार वारंवार घेत असलेल्या बैठकांमधील १० आमदारांपेक्षा जास्त आकडा फुगला नाही. पक्षात फूट पडल्यापासून त्यांच्याकडील ही संख्या रविवारच्या बैठकीपर्यंत कायम होती.
राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी पक्षाकडे ५४ आमदार होते. त्यापैकी भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे ही संख्या ५३ वर आली आहे. सध्या शरद पवार यांच्याकडे १० आमदारांचे संख्याबळ आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आमदार नवाब मलिक यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मलिक यांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. ते अद्यापही बांधावर आहेत. यावरून अजित पवार यांच्याकडे ४२ आमदार असल्याचे उघड झाले आहे.