नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते कधीही डबल गेम खेळतात. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडीचे दाखले देता येतात. शरद पवार हे बोलतात वेगळे आणि त्यांची कृती वेगळीच असते. या खेळीत त्यांचा हातखंडा आहे, असे खळबळजनक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. 29) माध्यमांशी बोलताना केले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत. छोट्या मोठ्या जाहिरातीवरून त्यांचे संबंध खराब होतील हे शक्यच नाही. दोघे नेते विचारांनी प्रगल्भ आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील शिंदे-भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. सर्वात चिंतेचा भाग म्हणजे राज्यात महिला आणि मुलींवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधून एकूण ४ हजार ४३१ मुली बेपत्ता झाल्या असून ही अत्यंत गंभीर आहे, असा दावा करत राज्यातील गृहमंत्र्यांनी इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा बेपत्ता मुलींच्या कुटुंबीयांच्या दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. फडणवीस म्हणतात माझ्या सोबत चर्चा करुन शपथ घेण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. माझा पाठिंबा हाेता असे म्हणता; मग पहाटे चोरुन शपथ का घेतली? असा सवाल शरद पवारांनी फडणवीस यांना केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेतृत्त्वासह राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत झाला नव्हता. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाला, असा गौप्यस्फोट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना शरद पवारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य करत फडणवीसांना टोला लगावला.