सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर पुन्हा विविध कार्यक्रमांची भिरकीट लावलेले खा. शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार सोमवारी सातार्यात मुक्कामी आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवस विविध कार्यक्रम पार पडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे सातार्याकडे लक्ष लागून राहिले आहे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या अनुषंगाने गेले काही दिवस राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर पवारांच्या दौर्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खा. शरद पवार यांचे सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता सातार्यात आगमन होत असून त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर होणार्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर रयतमध्ये बैठक होणार असून जकातवाडी येथील कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता ते बारामतीला रवाना होणार आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार सोमवारी सकाळी 10.30 वाजता कोरेगाव येथे बाजार समितीच्या विजयी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता सातार्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सत्कार व यशवंत गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडत आहे. सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर होणार्या रयतच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. मंगळवारी कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांच्यासह खा. श्रीनिवास पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीची नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सायंकाळी फलटण येथे आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा अमृतमहोत्सव सोहळा होत असून यावेळी आ. अजित पवार, आ. जयंत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. विश्वजित कदम हेही सोमवार व मंगळवारी सातार्यात आहेत. नाना पटोले सोमवारी सायं. 6 वाजता सातार्यात येत आहेत. मंगळवारी कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी अशा विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्यासोबत आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विश्वजित कदम हेही उपस्थित राहणार आहेत.