पुढारी ऑनलाईन डेस्क : Jawan Teaser : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ३ जूनचा दिवस एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. दक्षिणेतील चित्रपट निर्माता ऍटली आणि किंग खान एकत्र काम करत असून त्यांनी मोठी घोषणा केली आहे. शाहरुख आणि ऍटली यांच्या 'जवान' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या नव्या चित्रपटाचा टीझर (Jawan Teaser) रिलीज करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शाहरुखने 'जवान' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला असून त्यात शाहरुखची दमदार व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुखच्या पात्राचा लूक समोर आला आहे. या चित्रपटाची निर्मिती त्यांची पत्नी गौरी खान हिने केली आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीझर शेअर केला आहे.
शाहरुख खानचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'जवान' 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करताना शाहरुख खानने लिहिले की, 'अॅक्शन पॅक्ड 2023, जवान तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. 2 जून 2023 रोजी एक धमाकेदार मनोरंजन. हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये.'
चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख एका जुन्या घरात दिसत आहे, जेथे शस्त्रांचा साठा आहे. तो आपला चेहरा कपड्याच्या पट्टीने बांधतो. यादरम्यान शाहरुखच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. शाहरुख व्हिडिओमध्ये हसताना दिसतो आणि म्हणतो, 'रेडी'. टीझरमध्ये त्याच्या हातात बंदूक आणि चाकू दिसत आहे. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा 'झिरो' या चित्रपटात अनुष्का शर्मा, कतरिना कैफसोबत दिसला होता. (Jawan Teaser)
रिपोर्ट्सनुसार, जवान चित्रपटात शाहरुख खान डबल रोलमध्ये दिसेल असे समजते. नयनतारा तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर शाहरुख खान खूश नसल्याचे बोलले जात होते. त्याने दिग्दर्शक ऍटली याला पटकथेत बदल करण्यास सांगितले. ऍटली यांनीही या बदलांवर सहजतेने काम केले. चित्रपटाच्या पटकथेबाबत किंग खानकडून मिळालेल्या सल्ल्याने ऍटली खूप खूश असल्याचं ऐकण्यात आलं होतं.
जवान व्यतिरिक्त शाहरुख खान पठाण चित्रपटात दिसणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकेल. पठाणमध्ये शाहरुखसोबत जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखकडे आणखी एक महत्त्वाचा चित्रपट आहे त्याचे नाव आहे 'डंकी'. राजकुमार हिराणीच्या या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. बॅक टू बॅक तीन बिग धमाकेदार चित्रपट आणणाऱ्या किंग खानच्या या प्रोजेक्ट्सच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.