आपल्या शारीरिक आरोग्याबाबत सर्वजण जागरूक असतात. थोडासा ताप आला तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटून औषधोपचार सुरू करतो. परंतु, आपणास काही मानसिक त्रास जाणवत असेल किंवा काही लैंगिक समस्या (Sexual problems) असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत तत्परता दाखवत नाही.
लैंगिक आरोग्याचे महत्त्व ध्यानात घेऊन लैंगिकतेकडे आणि लैंगिक संबंधाकडे सकारात्मक द़ृष्टिकोनातून पहायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मत आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषांना लैंगिक इच्छा असते आणि हे मानवी जीवनातील एक नेहमीचा भाग आहे, हे सामाजिकद़ृष्ट्या स्वीकारायला हवे.
लोकांना लैंगिक इच्छा असली तरी सुरक्षित लैंगिक संबंधांना (Sexual problems) प्राधान्य द्यायला हवे. जोडीदाराबरोबर केलेल्या असुरक्षित लैंगिक संबंधामुळे अनेक लैंगिक संक्रमित आजार होण्याची शक्यता असते. तसेच एड्ससारखा आजारही असुरक्षित लैंगिक संबंधामुळेच पसरण्याची अधिक शक्यता असते.
असुरक्षित संबंधामुळे मुलींमध्ये नको असलेले गर्भारपण लादले जाऊ शकते. जोपर्यंत शारीरिकद़ृष्ट्या व मानसिकद़ृष्ट्या लैंगिक संबंधासाठी सक्षम होत नाही, तोपर्यंत लैंगिक संबंध टाळायला हवेत. संततीप्रतिबंधक साधनांची माहिती घेऊन त्यांचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. तसेच तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर योग्य पद्धतीने कुटुंबनियोजन करायला हवे.
लैंगिक आरोग्य चांगले असेल तर तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित राहू शकता. भारतीय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लैंगिक शिक्षण मिळाल्यास वैवाहिक जीवनात त्यांचे लैंगिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याबाबतचा निर्णय केंद्रशासन स्तरावर प्रलंबित असला तरी शासन याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना शाळेमध्येच लैंगिक शिक्षण मिळू शकेल. लैंगिकतेविषयी मुलांबरोबर बोलताना पालकांनी टाळाटाळ करू नये.
कोव्हिड या आजाराने गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घातलेले आहे. कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंदिस्त जीवन जगणार्या लोकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच लैंगिक आरोग्यावरही परिणाम झालेला आहे. कोव्हिडमुळे लोकांची कामेच्छा लक्षणीय स्वरूपात कमी झाल्याचे आढळून आले आहे. कोव्हिडमुळे पुरुषांच्या लैंगिक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता (ED) या लैंगिक विकाराचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे.
पती-पत्नींमधील वादविवाद वाढून घरगुती हिंसाचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे या पाहणीत नमूद केलेले आहे. सध्याच्या आभासी डिजिटल जगात इंटरनेटमुळे जग जवळ आले असले तरी पती-पत्नींमधील दुरावा अधिक वाढलेला आहे. मोबाईल फोनचा अतिवापर हा पती-पत्नींच्या वादविवादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (Sexual problems)
रात्री उशिरापर्यंत वेबसीरिज मालिका पहात असल्याने निद्रानाशाची समस्याही बर्याच जोडप्यांमध्ये दिसून येत आहे. इंटरनेटचा वापरही लक्षणीय प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढून पॉर्नचे व्यसन जडलेल्या युवकांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक शिथिलता येते. त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच पती-पत्नींनी समाजमाध्यमांचा अतिवापर टाळून एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यास पती-पत्नींचे नातेसंबंध सुद़ृढ राहण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल.
डॉ.राजसिंह सावंत