गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवरील मैत्री एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून 40 हजार रुपये उकळल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील तिघा जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे. किरण प्रेमराज थोरे (रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
वर्षभरापासून भुदरगड तालुक्यातील एक महाविद्यालयीन अल्पवयीन युवती व वाकरी (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील गणेश ढोरे यांच्यात इन्स्टाग्रामवर मैत्री होती. गणेश याने या युवतीकडून 40 हजार रुपये उकळले होते. तसेच तिला लग्नासाठी स्थळ काढल्याचे वारंवार सांगत होता. 14 जानेवारी रोजी गणेश याने फोनवरून युवतीस माझा मित्र मनोज डोळस हा चांगला मुलगा आहे. तू त्याच्याशी लग्न कर असे सांगून तुझ्या वाढदिवसाला त्याला घेऊन येतो, असे सांगितलेे. 18 जानेवारीला ती महाविद्यालयात गेली असता सकाळी गणेश याने फोन करून महाविद्यालय परिसरात आलो असल्याचे सांगितले.
यावेळी गणेश याच्यासोबत एक जोडपे होते. गणेेशने या तिघांची ओळख करून देताना मनोज डोळस सोबत जोडपे म्हणजे मनोजची बहीण पल्लवी थोरे आणि तिचा नवरा किरण थोरे असल्याचे सांगितले. त्यानंतर गणेशने मनोज व इतर दोघांसोबत युवतीला एका कॅफेत नेऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी मनोज डोळस याने तिला पसंत असल्याचे सांगून नंतर येऊन तुला घेऊन जातो, असे सांगितले.
27 जानेवारी रोजी सकाळी मनोज डोळसचा दाजी किरण थोरे याने फोन करून पीडित युवतीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. किरण व त्याची पत्नी पल्लवी हे मोटारीतून छत्रपती संभाजीनगर येथे युवतीला घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर मनोजने युवती पसंत नसल्याचे सांगितले. यानंतर किरण थोरे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, युवतीच्या वडिलांनी भुदरगड पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलिसांना छत्रपती संभाजीनगर येथे युवती असल्याचे समजले. पोलिसांनी शोध घेतला असता तिला व किरण थोरे याला मोटारीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी थोरे याला अटक केली.