पुणे, पुढारी वृत्तसेवा: सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर सत्यम शिवम् सुंदरम् या फाउंडेशनने आयोजित केलेले 'सेक्स तंत्र' नावाचे शिबीर अखेर रद्द करण्यात आले आहे. याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात संबंधीत आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाऊंडेशनचे संस्थापक रवि प्रकाश सिंग (रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील महिला पोलिस कर्मचारी मनिषा पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.
नवरात्र उत्सावाच्या निमित्ताने तरुणांना लैंगिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. त्याबाबत सोशल मीडियावर जाहिरातींचा मोठा मारा करण्यात आला. दोन दिवसीय निवासी शिबिरासाठी पंधरा हजार रुपये शुल्क असून त्याअंतर्गत निरनिराळी लैंगिक तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचा दावा या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आला होता.
दरम्यान ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक संघटनांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. या विकृत शिबीराला नवरात्री स्पेशल असं नाव दिलं गेलं, हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही, असा इशारा हिंदू महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी दिला आहे.
'या शिबीराच्या जाहिरातीत आयोजकांचा पत्ता, कार्यक्रमाचे ठिकाण आणि अन्य कोणतीही माहिती नाही. यावरूनच हे सर्व फसवे, घाणेरडे आणि एका विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार आहे आणि हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही. आम्ही यासंदर्भात पोलिसांना निवेदन दिले आहे, असे दवे यांनी सांगितले आहे. शहरातील अन्य अनेक संघटनांनी यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाकडून व्हायरल झालेल्या जाहिरातीच्या बाबातीत चौकशी करण्यात आली. तसेच संबंधीत फाऊंडेशनच्या व्यक्तीसोबत संपर्क करून त्यांना हे शिबीर आयोजीत करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम शिवम सुंदरम् फाऊंडेशनचे संस्थापक रवि सिंग याने गुरूवारी व त्याअगोदर सेक्स तंत्रा या नावाने जाहीरात तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारीत केली. जाहीरातीमध्ये स्त्री आणि पुरूषांचे अश्लिल फोटो छापून त्याचे जाहीर प्रदर्शन तसेच प्रसारण केल्याचे समोर आले. त्यानुसार सिंग याच्या विरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.