राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : वाफगाव(ता.खेड) येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात कोटी वीस लाखाचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला. ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन किल्ले वाफगाव येथे परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे,तेव्हा पासून संवर्धन कामाला सुरवात होणार असल्याचे भूषणसिंह राजे यांनी सांगितले. जेष्ठ नेते खासदार शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकी मध्ये रयत शिक्षण संस्थेने संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे. किल्ल्या मधील शाळा ही लवकरच स्थलांतरीत करण्यासाठी प्रयात्न चालू आहेत,पण तो पर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरवात करण्यात येणार आहे .
हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव हे मूळ गाव,सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला हा भव्य भुईकोट किल्ला उभारला.या किल्ल्याला सात भव्य दगडी बुरुज असून मुख्य किल्ल्यामध्ये भव्य प्रवेश द्वार, राणी महाल, विंष्णु पंचायतन, बुरुजातील विहिर, राजसदर, पश्चिम द्वार, भूमिगत खलबतखाने, होळकर कालीन तोफा अशा अनेक सुंदर वास्तू आज ही होळकरशाहीची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत.सध्या किल्ल्या मध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे, ही लोक भावना आहे. यामुळे वाफगाव व परिसराचा विकास होईल, येणाऱ्या पिढ्यांना तो प्रेरणा देत राहावा यासाठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे अनेक वर्षां पासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तू विशारद असून किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या टीम ने तयार केला आहे.
हेही वाचा :