नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जुन्या सिल्क रूटच्या धर्तीवर युरोप आणि चीनला जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बिल्ट अँड रोड प्रकल्पातून माघार घेत इटलीने चीनला जबर तडाखा दिला आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधानांनी चीनच्या पंतप्रधानांना आपण या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचा निर्णय सांगितला. चिनी पंतप्रधानांनी त्यांना केलेले फेरविचाराचे आवाहनही इटलीच्या पंतप्रधानांनी धुडकावून लावले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चीनचे पंतप्रधान ली क्वांग यांना स्पष्टपणे इटली या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. यावर ली यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मेलोनी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण मेलोनी यांनी त्याला दाद दिली नाही.
आगामी काही आठवड्यांतच बिजींग येथे बिल्ट अँड रोड प्रकल्पाच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची तिसरी बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इटलीने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मेलोनी म्हणाल्या की, बिल्ट अँड रोड प्रकल्पातून माघार घेण्याच्या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. पण इटली चीनसोबतच्या संबंधांवर तडजोड करणार नाही हेही तितकेच खरे. इटलीच्या निर्णयामागे अमेरिका व इतर पाश्चात्य देशांचा दबाव नसल्याचेही मेलोनी यांनी चिनी पंतप्रधानांना सांगितले.
2004 मध्ये चीनने पुढाकार घेत बिल्ट अँड रोड प्रकल्प हाती घेतला होता. त्यात जी 7 देशांपैकी एकमेव इटलीने करारावर स्वाक्षर्या केल्या होत्या. त्यामागे जागतिक व्यापार वृद्धीचा विचार होता. पण मागील काही काळापासून या प्रकल्पात सहभागी होत चूक केल्याची भावना इटलीत निर्माण झाली होती. इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनीही या कराराबाबत नाराजी व्यक्त केली होती. मार्च 2024 मध्ये हा करार संपणार असून त्याचे आपोआप नूतनीकरण होणार असल्याने त्या आधीच बाहेर पडण्याचा निर्णय इटलीने घेतला आहे.